शिराळा : भव्य कमानी, नागराज मंडळांचे स्वागत फलक, भाविकांसाठी आवश्यक साेयी-सुविधांनी शिराळा शहर शुक्रवारी (दि. ९) हाेणाऱ्या नागपंचमी उत्सवासाठी सज्ज झाले आहे. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण झाली आहे.शहरात ६००हून अधिक पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय कॅमेरामन, १२ ध्वनिमापक यंत्रांचे नियोजन करण्यात आले आहे. अंबामाता मंदिर परिसर, मिरवणूक मार्गावर २० सीसीटीव्ही कॅमेरे, ४ वाॅच टॉवर ठेवण्यात आले आहेत. २० व्हिडीओ कॅमेऱ्यांद्वारे चित्रीकरण करण्यात येणार आहे. बॉम्बशोधक पथक, दंगलविरोधी पथक तैनात असणार आहे. उपअधीक्षक मंगेश चव्हाण व निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील व डॉ. एन. बी. कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. मुख्याधिकारी नितीन गाढवे यांनी शहरात स्वच्छता मोहीम राबवली असून, पाणी व आरोग्याची दक्षता घेतली जात आहे.वनखात्यानेही मोठा फौजफाटा मागविला असून, उपवनसंरक्षक नीता कट्टे, डॉ. अजित साजणे, वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली १३५ अधिकारी, कर्मचारी, ६ गस्ती पथकांची नियुक्ती केली आहे. समाजमाध्यमांवरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण कक्षाची नेमणूक करण्यात आली आहे.
प्रवाशांच्या साेयीसाठी शिराळा आगारातील ३० व इतर आगारातील २० जादा तैनात बसेस आहेत. शिराळा-इस्लामपूर, शिराळा-कोकरूड, शिराळा-बांबवडे, शिराळा-कोडोली मार्गावर जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. शिराळाकडून इस्लामपूरकडे जाणारी वाहतूक कापरी कार्वे लाडेगावमार्गे इस्लामपूर तसेच इस्लामपूरकडून शिराळाकडे येणारी वाहतूक पेठमार्ग एकेरी होणार आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक धन्वंतरी ताटे यांनी दिली.यात्रा कालावधीत विद्युत पुरवठा खंडित होऊ नये याची खबरदारी उपकार्यकारी अभियंता एल. बी. खटावकर यांनी घेतली आहे. प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन व तहसीलदार शामला खोत यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.यात्रेसाठी गेल्या चार दिवसापासून ग्रामदेवता आंबा माता मंदिर परिसरात मेवामिठाई, खेळणी, हॉटेलसह व्यापारी दाखल झाले आहेत. यात्रेचा आनंद लुटण्यासाठी पाळणे-खेळणी उभारणी मंदिर परिसरात केली आहे.ग्रामदेवता अंबा माता मंदिर परिसरात भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था ट्रस्टचे अध्यक्ष संभाजी गायकवाड, सम्राट शिंदे यांनी केली आहे. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.