मिरज : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातर्फे मिरज-शेणोलीदरम्यान रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाची रेल्वे सुरक्षा आयुक्त ए.के. जैन, सुरक्षा निरीक्षक आर.के. शर्मा यांच्या उपस्थितीत शुक्रवारी चाचणी पार पडली. मार्गावर विद्युत इंजिनाने ६४ किलाेमीटरचे अंतर ६० मिनिटांत पूर्ण केले. विद्युत इंजिनाची चाचणी यशस्वी झाल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. चाचणीदरम्यान रेल्वे इंजीनचा सर्वाेच्च वेग १५० किलाेमीटर प्रतितास
हाेता. पुणे-मिरज-लोंढा रेल्वेमार्गावर विद्युतीकरणासह दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. मिरज-पुणे रेल्वेमार्गावर बहुतांश ठिकाणी विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. मिरज-शेणोलीदरम्यान ६४ किलाेमीटर मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून दोन महिन्यांपूर्वी मिरज-शेणोलीदरम्यान विद्युतचाचणी घेण्यात आली होती. शुक्रवारी रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या उपस्थितीत मध्य रेल्वेतर्फे शेणोली-ताकारी व मिरज-शेणोलीदरम्यान ताशी १५० किलाेमीटर वेगाने विद्युत इंजिनाची चाचणी पार पडली.
मिरज-पुणे यादरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर एक्स्प्रेस, पॅसेंजरचा वेग वाढणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. शुक्रवारी दुपारी मिरज स्थानकातून ह.भ.प. ज्ञानेश्वर पोतदार (महाराज) यांच्या हस्ते विद्युत इंजीनची पूजा करून चाचणी घेऊन विशेष रेल्वे रवाना करण्यात आली. मिरज-पुणे मार्गावर ताकारी-शेणोली, फुरसुंगी-पुणे यादरम्यान दुहेरीकरण व मिरजेपर्यंत विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. त्याची यशस्वी चाचणी पार पडली. मिरज-कोल्हापूर रेल्वेमार्गाचेही विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, विद्युतीकरणासह मिरज स्थानकात फलाट क्रमांक १ व ३ वर बसविण्यात आलेल्या लिफ्टची व स्थानकात सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी केली.