जत : जत तालुक्यातील सालेकिरी येथे वीस फूट खड्ड्यातील पाण्यात बुडून सख्ख्या बहिणींसह तीन शालेय विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. ही घटना आज, बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान घडली. पूजा रवींद्र पाटील (वय १३), निकिता रवींद्र पाटील (११) आणि ऐश्वर्या राजू धोडमणी (७) अशी मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. हा खड्डा पवनऊर्जा कंपनीने मुरुम उचलण्यासाठी काढला होता. तहसीलदार दीपक वजाळे यांनी घटनास्थळास भेट देऊन संबंधित कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सालेकिरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.सालेकिरी ते पाच्छापूर रस्त्यावर सालेकिरीपासून अर्धा किलोमीटरवर पाटील वस्ती आहे. तेथील बाबासाहेब सावंत व आप्पासाहेब सावंत यांच्या मालकीची वतन शेतजमीन पुरनदास व्हनखंडे यांनी एक वर्षापूर्वी खरेदी केली आहे. परंतु, त्यांच्या नावाची नोंद अद्याप झालेली नाही. व्हनखंडे यांनी जमिनीत खड्डा खोदून मुरुम उचलण्यास पवनऊर्जा कंपनीला तोंडी परवानगी दिली आहे. पाटील वस्तीलगतच मुरुमासाठी वीस फूट खोल खड्डा खणण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांच्या पावसामुळे खड्ड्यात पाणी साचले होते. या पाण्यानेच या तिघींचा घात केला. पाटील यांना चार मुली व एक मुलगा आहे, तसेच धोडमणी यांनाही चार मुली व एक मुलगा आहे. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास गावकऱ्यांनी मुलींना पाण्यातून बाहेर काढून जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. विलासराव जगताप, पंचायत समिती सदस्य नितीन शिंदे, सुनील पवार, नगरसेवक उमेश सावंत व बापूसाहेब पाटील यांनी रुग्णालयात जाऊन पाटील व धोडमणी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. (वार्ताहर)
सालेकिरीत तिघींचा बुडून मृत्य
By admin | Published: July 10, 2014 12:46 AM