लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : आमदार सुधीर गाडगीळ यांनी स्थानिक विकास निधीमधून पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयासाठी ५ ऑक्सिजन व्हेंटिलेटर, तसेच ऑक्सिजननिर्मिती प्लांट उभारण्यासाठी एकूण १ कोटी १६ लाख ५० हजार रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे सुपूर्द केले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात भासू लागली आहे. त्यामुळे सध्या शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. त्याचबरोबर व्हेंटिलेटरचीही कमतरता मोठ्या प्रमाणात भासत आहे. त्यामुळे स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत निधीतून २६ लाख ५० हजार रुपयांचे पाच व्हेंटिलेटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. गाडगीळ म्हणाले, आज या दोन्ही वैद्यकीय यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. लवकरच हा निधी उपलब्ध होऊन दोन्ही बाबींची पूर्तता होईल. त्यामुळे कोरोनाबरोबरच इतरवेळीही गरजू रुग्णांना याचा फायदा होईल, तसेच रुग्णालय परिसरात नवीन हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. त्यासाठीही या ऑक्सिजननिर्मिती प्लांट व व्हेंटिलेटरचा उपयोग होईल. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना यासाठी निधी मागणी पत्र दिले. यावेळी भाजपचे नेते नगरसेवक शेखर इनामदार, गणपती साळुंखे, मकरंद म्हामुलकर आदी उपस्थित होते.