सांगली : खासदार संजयकाका पाटील यांच्या तासगाव एसजीझेड, एसजीऐ शुगर, नागेवाडी (ता. खानापूर) येथील यशवंत शुगर या दोन कारखान्यांकडे ४४ कोटी ६४ लाख रुपयांची शेतकऱ्यांची एफआरपी थकीत आहे. याप्रकरणी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी आरआरसी (महसूल वसुली प्रमाणपत्र) कारवाई केली आहे. महसूल प्रशासनाने कारखान्याची मालमत्ता जप्त करून शेतकऱ्यांना शंभर टक्के एफआरपी द्यावी, असेही आदेशात म्हटले आहे.
संजयकाका यांच्या मालकीचे असलेल्या तुरची (ता. तासगाव) येथील तासगाव एसजीझेड व एसजीऐ शुगर या कारखान्यांकडे ३१ मार्च २०२१ अखेरीस शेतकऱ्यांनी घातलेल्या उसाची ३९ कोटी चार लाख रुपये एफआरपीची रक्कम होती. त्यापैकी दहा कोटी ५७ लाख रुपये शेतकऱ्यांना मिळाले. उर्वरित २८ कोटी ४७ लाख रुपये थकीत आहेत. नागेवाडी येथील यशवंत शुगर कारखान्यांकडे एफआरपीची एकूण रक्कम ३२ कोटी ३७ लाख रुपये होते. त्यापैकी शेतकऱ्यांना १६ कोटी २० लाख रुपये मिळाले असून १६ कोटी १७ लाख रुपये थकीत आहेत. याबद्दल शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी साखर आयुक्तांकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार साखर आयुक्तांनी संजयकाका पाटील यांच्या तासगाव एसजीझेड, एसजीऐ शुगर आणि यशवंत शुगरला थकबाकीप्रकरणी आरआरसीची नोटीस बजावली आहे. या नोटीसवर जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करून शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असेही गायकवाड यांनी म्हटले आहे.
चौकट
सदगुरु श्री श्री, हुतात्मा कारखान्यास यलो कार्ड
राजेवाडी (ता. आटपाडी) येथील सदगुरु श्री श्री या कारखान्याने १५० कोटी पाच लाख एकूण एफआरपीपैकी ९१ कोटी ८० लाख रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. ५८ कोटी २५ लाख रुपये थकीत आहेत. वाळवा येथील हुतात्मा कारखान्याने ११८ कोटी आठ लाख एकूण एफआरपीपैकी १०६ कोटी २७ लाख रुपये म्हणजे ९० टक्के एफआरपी शेतकऱ्यांना दिली आहे. ११ कोटी ८१ लाख रुपये शेतकऱ्यांना एफआरपी दिली नाही. याप्रकरणी या कारखान्यांना साखर आयुक्तांनी यलो कार्ड दिले असून तात्काळ शेतकऱ्यांना एफआरपी देण्याची सूचना दिली आहे.
चौकट
११ कारखान्यांनी दिली १०० टक्के एफआरपी
राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव, कारंदवाडी, तिपेहळ्ळी हे चार युनिट, क्रांती, मोहनराव शिंदे, विश्वासराव नाईक, दालमिया, वसंतदादा-दत्त इंडिया, सोनहिरा, उदगिरी शुगर या ११ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना शंभर टक्के एफआरपीची रक्कम दिली आहे, असे साखर आयुक्त गायकवाड यांनी सांगितले.