लोकमत न्यूज नेटवर्ककोपर्डे हवेली : शेतकऱ्यांची शेती शाश्वत राहिली नाही. उत्पादन घेत असताना त्यांना अनेक गोष्टीचा सामना करावा लागतो. नैसर्गिक आपत्तीसह बाजारपेठेतील दरांमुळे शेतकऱ्यांना अनेकवेळा उत्पादन खर्चही हाती लागत नाही. मात्र, याच बेभरवशी शेतीत वर्षात वेगवेगळी पिके घेऊन फायदा मिळविण्याचा प्रयत्न कोपर्डे हवेलीतील शेतकऱ्यांनी केलाय. आजपर्यंत ज्या शिवारात ऊस पिकायचा त्याच शिवारात सध्या भोपळ्याचे वेल पसरलेत. दहा एकरापेक्षा जास्त शिवारात सध्या हे पिक घेतलं गेलय.कमी कालावधीत, कमी खर्चात आणि वजनी पीक म्हणुन चाकी भोपळा पिकाकडे पाहीले जाते. हे पीक कोणत्याही हंगामात येते. निचऱ्याची जमीन पिकाला योग्य असते. तीन महिन्यात हे पिक एकाच वेळेस काढणीस येते. कोपर्डे हवेलीतील सुदाम चव्हाण यांची जमीन मध्यम स्वरुपाची आहे. मार्चच्या पहील्या आठवड्यात त्यांनी दंड आणि सारटी सोडुन भोपळ्याच्या बियाची टोकण केली. दोन्ही दंडातील अंतर सात फुट ठेवले. तणाची उगवण होवु नये म्हणुन लागणीपुर्व तणनाशक औषधाची फवारणी केली. त्यामुळे भांगलणाचा खर्च कमी झाला. येत्या आठ दिवसात चाकी भोपळ्याचा प्लॉट तोड्यास आला आहे. एका एकरामध्ये सुमारे बारा ते पंधरा टनाचे उत्पादन निघेल, असा चव्हाण यांचा अंदाज आहे. भोपळे वजनदार असुन तीन किलोपासुन दहा किलोपर्यंत त्याचे वजन आहे. दर चांगला लागला तर खर्च वजा जावुन १ लाख २५ हजाराचे उत्पादन मिळेल, असा अंदाज आहे. तसेच जमीनवर पसरलेले वेलांचे खत तयार होणार आहे. भोपळा काढुन चव्हाण हे भाताचे पिक घेणार आहेत. भोपळ्याचा वेल रोटावेटरने बारीक करुन त्याचे खत तयार केले जाणार आहे. या पध्दतीमुळे त्यांना दुहेरी फायदा होणार आहे. सुदाम चव्हाण यांच्यासह इतर शेतकऱ्यांनीही भोपळ्याचे उत्पन्न घेण्यास सुरूवात केली आहे. मुंबईमधील वाशी मार्केटला भोपळ्याची मागणी असते. शिवाय पुणे येथील गुलटेकडीच्या बाजारपेठेत अनेक शेतकरी भोपळा विक्रीसाठी घेवुन जातात. सध्या वाशी बाजारपेठेत टनाचा दर दहा ते बारा हजार रुपये आहे. वजनी पीक असल्याने आणि कमी दिवसात, कमी खर्चात येत असल्याने तसेच पुढील पीकास बीवड चांगला असल्याने हे पीक घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कोपर्डे हवेली गावातील शेतकऱ्यांनी सुमारे दहा एकरावर भोपळ्याच्या पिकाचे उत्पादन घेतले आहे.दुर्लक्षित पिकाला पुन्हा बहरचाकी भोपळ्याचे पीक या विभागातून दुर्लक्षित झाले होते; पण गेल्या दोन वर्षापासुन कोपर्डे हवेली येथील शेतकरी उत्तम चव्हाण यांनी हे पीक घेण्यास सुरुवात केली. त्यामध्ये त्यांना नफा चांगला मिळाला. शिवाय इतर पिकांना बीवड चांगला ठरल्याने इतर शेतकऱ्यांनी भोपळ्याची लागवड केली आहे. गावाच्या शिवारात सुमारे दहा एकर क्षेत्रावर हे पीक सध्या घेतले आहे.खानावळीत होतो जास्त वापरचाकी भोपळा हा हॉटेलचे पदार्थ करण्यासाठी वापरला जातो. तसेच घरगुती भाजी करण्यासाठी वापरण्यात येतो. खास करून मुंबईत खाणवळीमध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. इतर पिकाच्या तुलनेत जास्त दिवस तो टिकुन राहतो.
साखरेच्या शिवाराला भोपळ्याचा लळा!
By admin | Published: June 13, 2017 11:40 PM