सांगली : ऊसदरावर तोडगा निघून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन स्थगित केल्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. रविवारपासून जिल्ह्याच्या सर्व भागातील ऊसतोडी गतीने सुरू झाल्या आहेत. कारखान्यांची धुराडी पेटली असून, वादाचा कडवटपणा जाऊन हंगामाचा गोडवा कारखानदारांच्या चेहऱ्यावर दिसू लागला आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी जिल्हा बंदची हाक दिली होती. त्यामुळे दराचा तोडगा काढण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या. शनिवारी दुपारी कोल्हापूर जिल्ह्यातील आंदोलनाबाबत यशस्वी तोडगा निघाल्यानंतर रात्री वांगी (ता. कडेगाव) येथील सोनहिरा सहकारी साखर कारखान्यावर जिल्ह्यातील कारखान्यांचे प्रतिनिधी व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीतही कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी करण्याचे आंदोलक व कारखानदारांनी मान्य केल्यानंतर रात्री उशिरा रविवारी होणारे आंदोलन मागे घेण्यात येत असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली. एकरकमी एफआरपी तसेच साखरेला ३ हजार ४०० रुपये दर मिळाल्यास प्रतिटन २०० रुपये अधिक दर देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. आंदोलन मागे घेतल्याने रविवारी सकाळपासून जिल्ह्याच्या बहुतांश तालुक्यात ऊसतोडीला सुरुवात झाली.सांगलीतील दत्त इंडिया प्रा. लि. चा वसंतदादा कारखाना, राजारामबापू कारखान्याचे चारही युनिट, सोनहिरा, क्रांती, हुतात्मा, मोहनराव शिंदे यासह सर्व प्रमुख सहकारी साखर कारखाने, खासगी कारखान्यांची धुराडी रविवारी पेटली. ऊसतोडीला वेग आल्याने दिवसभर मजुरांची, वाहनांची लगबग सुरू होती. रस्त्यावरील ऊसवाहतूक करणाºया वाहनांची संख्याही वाढली होती. मिरज, तासगाव, वाळवा, शिराळा, कडेगाव, खानापूर, आटपाडी, पलूस याठिकाणी मोठ्या प्रमाणावर ऊसतोडी सुरू होत्या.दत्त इंडियाचे कार्यकारी संचालक मृत्युंजय शिंदे यांनी सांगितले की, शनिवारी रात्री तोडगा निघाल्याने कारखानदारांना दिलासा मिळाला आहे. रविवारी आम्ही पूर्ण क्षमतेने कारखाना सुरू केला असून, तोडींनाही प्रारंभ झाला आहे. आता कोणतीही अडचण नाही. हा हंगाम चांगल्या पद्धतीने पार पडेल, अशी आशा आहे.
सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 11:45 PM