सांगली : उसाच्या एफआरपीची रक्कम एकरकमी देणे कायद्यानेच कारखान्यांना बंधनकारक असताना, खा. राजू शेट्टींकडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे, असा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे उपाध्यक्ष डॉ. अशोक ढवळे व डॉ. उदय नारकर यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केला.ते म्हणाले की, ऊस उत्पादकांना डॉ. स्वामिनाथन् समितीच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्च आणि त्यावर ५० टक्के नफा देण्याच्या हमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला पाठिंबा दिल्याचे खासदार राजू शेट्टी शेतकऱ्यांना सांगत होते. सध्या मात्र मोदींनी स्वामिनाथन् समितीच्या शिफारशी लागू करण्यास नकार दिला आहे, तरीही खा. राजू शेट्टी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना मोदी यांची साथ सोडण्यास तयार नाहीत. शेतकऱ्यांचे ऊस दराकडील लक्ष विचलित करण्यासाठी एफआरपी एकरकमी मिळावी, यासाठी ते आंदोलनाचा इशारा देत आहेत. ते म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मागील गळीत हंगामातील अंतिम बिले मिळालेली नाहीत, याकडे खा. शेट्टींनी दुर्लक्ष केले आहे. याउलट एफआरपीची रक्कम कारखानदारांनी एकरकमीच दिली पाहिजे. त्या प्रश्नावर शेट्टी आंदोलन करून काय साध्य करणार आहेत, हे कळत नाही. शेट्टी आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वादात शेतकऱ्यांचे व साखर उद्योगाचे नुकसान होणार आहे. या गळीत हंगामामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ३७५० रुपये दर मिळाला पाहिजे. दि. १४ डिसेंबर रोजी राज्यातील देवस्थान जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांचा सातारा येथे मेळावा घेण्यात येणार आहे. यावेळी सचिव किसन गुजर, सहसचिव अजित नवले, उमेश देशमुख आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
ऊस उत्पादकांची राजू शेट्टींकडून फसवणूक
By admin | Published: October 27, 2015 11:14 PM