म्हैसाळ : सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्या कारखान्याने विकासाचा टप्पा गाठला आहे. केंद्र शासन साखरेस प्रति क्लिंटल किमान ३७०० ते ४००० इतकी किंमत देणे गरजेचे आहे. अन्यथा कारखाने कर्ज व व्याजामुळे अडचणीत येतील, असे मत मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे-म्हैसाळकर यांनी व्यक्त केले.
कोरोनामुळे वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. शिंदे म्हणाले, मागील तीन ते चार गळीत हंगामात भारतासह इतर देशात साखरेचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले आहे. त्यामुळे साखरेचा उठाव झालेला नाही. त्यामुळे केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या दराने साखर विक्री होऊ शकली नाही. यावेळी सभेच्या सुरूवातीस आबासाहेब शिंदे म्हैसाळकर व राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन अण्णासाहेब कुरणे व मोहन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. अहवाल सालात दिवंगत झालेल्या सभासदांना कारखान्याचे संचालक अशोक वडगावे यांनी श्रध्दांजली अर्पण केली. कारखान्याचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाटील यांनी विषयपत्रिकेतील सर्व विषय वाचून दाखविले. संचालक विजयसिंह भोसले यांनी अहवाल वाचन केले. कारखान्याचे उपाध्यक्ष परसाप्पा पाटील यांनी आभार मानले.