शिराळा : बिऊर (ता. शिराळा) येथील बिरोबा मंदिर येथे उसाच्या शेतात विद्युत तारातील शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत तब्बल चार एकर ऊस जळून खाक झाला. त्यामध्ये पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
महावितरणच्या या अनागोंदी कारभाराबाबत शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. याशिवाय झालेल्या उसाच्या नुकसानीची भरपाई महावितरणने द्यावी, अशी मागणी केली आहे.
येथील बिरोबा मंदिराच्या शेजारी रामचंद्र बापू नलावडे यांची पाच एकर जमीन आहे. या पाच एकरांपैकी त्यांनी या वर्षी चार एकर उसाची लावणी केलेली आहे. उसाला लागूनच विद्युत वाहक तारा आहेत. लोंबकळणाऱ्या विद्युत वाहक तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन त्याच्या ठिणग्या उसात पडल्या. यामुळे चार एकर ऊस जळून खाक झाला.
कोट
महावितरणने झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी. शिराळा पोलीस ठाणे येथे महावितरणच्या या अनागोंदी कारभारासंदर्भात फिर्याद दाखल करणार आहे. साखर कारखान्याकडे उसाच्या तोडीणीसाठी अर्ज केला आहे; परंतु महावितरण दुरुस्तीच्या संदर्भात नेहमीच टाळाटाळ करीत असल्याने अशा अपघातांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो आहे.
- रामचंद्र नलावडे
शेतकरी