लाेकमत न्यूज नेटवर्क
घाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्याचा आर्थिक कणा समजल्या जाणाऱ्या महांकाली सहकारी साखर कारखान्याचे धुराडे चालूवर्षी न पेटल्याने त्याचा मोठा फटका ऊस उत्पादक शेतकरना बसत आहे. तयार झालेल्या ऊसाचा वेळेत उठावच होत नसल्याने सध्या उसाला तुरे फुटू लागले आहेत. परिणामी उत्पादन घटण्याची भीती निर्माण होत आहे.
गेल्या काही वर्षात तालुक्यात म्हैसाळ व टेंभूचे पाणी नियमितपणे मिळत आहे. गेल्या दोन वर्षापासून वरुणराजानेही चांगलीच कृपादृष्टी दाखविल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनीही नगदी पीक म्हणून ऊस लागवडीस मोठी पसंती दिली आहे. त्यामुळे आपसुकच दुष्काळी गणल्या जाणाऱ्या कवठेमहांकाळ तालुक्यात उसाचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात वाढले. परंतु सततच्या दुष्काळाने व काही अपरिहार्य कारणामुळे रडतखडत चाललेला तसेच संपूर्ण तालुक्याचे लक्ष असलेला महांकाली सहकारी साखर कारखाना चालूवर्षी सुरूच हाेऊ शकला नाही. त्याचा मोठा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकविलेल्या उसाचा प्रश्न निर्माण झाला.
सध्या कवठेमहांकाळ तालुक्यात उगार शुगर, केंपवाड कारखाना, दत इंडिया सांगली, रेणुका शुगर अथणी, तासगाव कारखान्याच्या टोळ्या ऊस ताेडीसाठी सक्रिय झाल्या आहेत. पण चालूवर्षी सर्वत्र उसाचे प्रमाण जास्त असल्याने हे कारखानेही पहिल्यांदा त्यांच्या कार्यक्षेत्रातील उसाला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे तालुक्यातील उसाच्या तोडीसाठी बळीराजाला चांगलीच वाट पाहावी लागत आहे.
त्यामुळे उसाची तोडणी लवकर होत नसल्याने उसाला तुरे फुटू लागले आहेत. त्यामुळे उसाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे.
फोटो : १३ घाटनांद्रे १
ओळी : कवठेमहांकाळ-जाधववाडीदरम्यानच्या शेतीत ऊसास आलेले तुरे.