दिघंची : दिघंची (तरटी मळा) येथील दहा एकरांवरील उसाला शॉर्टसर्किटने आग लागून ठिबक योजनेच्या साहित्याचे व उसाचे एकूण पाच लाखांचे नुकसान झाले. ही घटना आज, रविवारी दुपारी तीन वाजता घडली. दिघंचीपासून चार किलोमीटर अंतरावर तरटी मळा आहे. या ठिकाणी माजी उपसरपंच बाळासाहेब मोरे यांची बागायत शेती आहे. या ठिकाणी ठिबक सिंचनवर त्यांनी ‘२६५’ या जातीच्या उसाची लावण केली होती. या शेतास लागलेल्या आगीत सिंचनाच्या पाईप, फिल्टर, लॅटरल असे एकूण दोन लाखांचे, तर उसाचे तीन लाखांचे असे एकूण पाच लाखांचे नुकसान झाल्याची माहिती मोरे यांनी दिली. कारखान्याचे ऊस गाळप सुरू असल्याने ऊस कारखान्याला घालविण्याची लगबग सुरू आहे. लवकरच कारखान्याला ऊस पाठविण्यात येणार होता. घटनास्थळी ‘महावितरण’चे कर्मचारी कुंभार यांनी भेट देऊन पाहणी केली. रविवारी सुटी असल्याने शासकीय पंचनामा झाला नाही. (वार्ताहर)
दिघंचीत दहा एकरांतील ऊस खाक
By admin | Published: January 12, 2015 1:18 AM