कडेगाव : ऊस दर जाहीर न करता काही साखर कारखानदारांनी गळीत हंगाम सुरु केले आहेत. त्यामुळे आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी कडेगाव तालुक्यातील वांगी व कडेपूर येथे उदगिरी शुगर्स या साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमधील हवा सोडली. यामुळे गळीत हंगामाच्या पहिल्याच दिवशी ऊसदर आंदोलनाची ठिणगी पडली आहे.जिल्ह्यातील काही कारखाने सोमवारपासून सुरु झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना मात्र दर जाहीर झाल्याशिवाय ऊसतोडी होऊ देणार नाही, या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे वांगी व कडेपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पोपट मोरे व संघटनेचे नेते संदीप राजोबा यांच्यासह संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उदगिरी शुगर्स या कारखान्याच्या ऊस ट्रॅक्टरमधील हवा सोडली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद येत्या २३ नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या ऊस परिषदेला उपस्थित राहण्याबाबत शेतकऱ्यांना आवाहन करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते पोपट मोरे व संदीप राजोबा व काही कार्यकर्ते कडेगावला निघाले होते. त्यावेळी वांगी येथून उदगिरी कारखान्याला निघालेला ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर त्यांनी पहिला व त्यांनी या ट्रॅक्टरमधील पुढच्या चाकातील व ट्रॉलीच्या चाकातील हवा सोडली. यानंतर काही वेळाने कडेपूर येथेही उदगिरी शुगर्स या कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणाºया ट्रॅक्टरमधील हवा सोडली. यामुळे पहिल्याच दिवशी आंदोलनाची ठिणगी पडली.या आंदोलनाने कडेगाव तालुक्यात वातावरण तापले आहे. दरम्यान, दुपारी आंधळी (ता. पलूस) येथेही पोपट मोरे व संदीप राजोबा यांनी उदगिरी शुगर्सच्या ऊस वाहतूक करणाºया ट्रॅक्टरमधील हवा सोडली.
वांगी, कडेपुरात ऊस वाहतूक रोखली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 12:40 AM