लोकमत न्यूज नेटवर्क
ऐतवडे बुद्रुक : वाळवा तालुक्यातील इतर गावांचे घर पडझडीचे अनुदान आपत्तीग्रस्तांच्या खात्यावर जमा झाले. परंतु, चिकुर्डे येथील आपत्तीग्रस्तांच्या घर पडझडीचे प्रस्तावाला विलंब का झाला, असा प्रश्न उपस्थित करून आमदार मानसिंगराव नाईक यांनी तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना जाब विचारला. प्रशासनातील या त्रुटी दूर करून चिकुर्डेतील आपत्तीग्रस्तांना त्वरित निधीची पूर्तता करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.
चिकुर्डे (ता. वाळवा) येथे २०१९मधील ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीत घरांची पडझड मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यांच्या पडझडीचे प्रस्ताव अद्यापर्यंत वाळवा महसूल प्रशासनाकडून प्रलंबित राहिले होते. या संदर्भात चिकुर्डेतील आपत्तीग्रस्तांच्या शिष्टमंडळासह महसूल प्रशासनासोबत आमदार नाईक यांनी इस्लामपूर येथे बैठक घेतली. या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य संजीव पाटील, अभिजीत पाटील, देवराज पाटील उपस्थित होते.
यावेळी आमदार नाईक म्हणाले, चिकुर्डे येथील १२६ आपत्तीग्रस्तांचे प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यासाठी दोषी असणाऱ्या सर्वांवर कारवाई करा, अशा कामचुकार कर्मचाऱ्यांना पाठीशी घालू नका. यावेळी त्यांनी तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी बोलून आमदार नाईक यांनी हे अनुदान आपत्तीग्रस्तांच्या खात्यावर चार ते पाच दिवसात जमा करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी कृष्णात पवार, उपसरपंच उत्तम पाटील, अमृत पांढरे, शामराव पाटील, बाळासाहेब पाटील, बाबासाहेब खोत, चाॅंदसाहेब तांबोळी, जयसिंग पाटील, अनिल चिवटे, सुरेंद्र पाटील, दत्ता सीद उपस्थित होते.