सांगली : जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन समित्यांचे सभापतीपद देण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. सभापती अरुण राजमाने यांच्याकडे बांधकाम-अर्थ, तर सभापती तम्मणगौंडा रवी यांच्याकडे शिक्षण व आरोग्य समित्या देण्याचा निर्णय भाजप आणि मित्रपक्षांच्या बैठकीत झाला. गुरुवारी सभापती आणि सदस्यांना समित्यांचे वाटप करण्यासाठी दुपारी एक वाजता विशेष सभा होणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला ३४, तर भाजपला ४९ समित्यांचे वाटप करण्यावरही एकमत झाले आहे.गुरुवारी सर्वसाधारण सभेत विषय समितींच्या दोन सभापतींना समितींचे वाटप आणि दहा समित्यांवर सदस्यांची निवड होणार आहे. निवडी बिनविरोध होण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे २६ सदस्य आणि ३ सभापती असे २९ संख्याबळ होते. त्यांच्याकडून ३४-४९ जागांचा फॉर्म्युला सादर करण्यात आला होता. भाजप-आघाडीकडे ३६ सदस्यांचे बळ आहे. त्यांना सूत्रांनुसार ४९ जागा मिळणार आहेत. मात्र स्थायी आणि अर्थ समितीसाठी शेवटपर्यंत रस्सीखेच सुरू होती. विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीचा ३४ जागांचा फॉर्म्युला सत्ताधाऱ्यांनी अमान्य केला. ३४ जागांबाबत तडजोड करावी लागेल, असे संकेत भाजपने दिले आहेत. सत्ताधारी भाजप आघाडीत शिवसेना, रयत विकास आघाडी, स्वाभिमानी विकास आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा समावेश आहे. आघाडीतील सदस्यांनी दोन समितींवर नियुक्तीचा रेटा लावला आहे. त्यामुळे सदस्यांची नियुक्ती करण्यात सत्ताधारी भाजपला तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र त्याबाबतची अधिकृत घोषणा निवडीपूर्वी जाहीर केली जाणार आहे. भाजपचा प्रस्ताव विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीने स्वीकारल्यास विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी संग्रामसिंह देशमुख, तर उपाध्यक्षपदी सुहास बाबर यांची वर्णी लागली, तर ब्रह्मदेव पडळकर यांना समाजकल्याण व प्रा. सुषमा नायकवडी यांना महिला बालकल्याण विभागाचे सभापतीपद मिळाले. अरुण राजमाने आणि तम्मणगौडा रवी यांचीही सभापतीपदी वर्णी लागली असली तरी त्यांना खाते मिळालेले नाही. उपाध्यक्ष बाबर यांना कृषी व पशुसंवर्धन विभाग निश्चित झाले आहेत, मात्र या खात्यांबाबत ते समाधानी नसल्याने मुंबईत शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांची भाजप नेत्यांकडून मनधरणी करण्यात आली. राजमाने यांना बांधकाम आणि अर्थ, तर रवी यांच्याकडे शिक्षण व आरोग्य विभागाचे खाते दिले जाणार आहे. तिन्ही पदाधिकाऱ्यांच्या खात्यांमध्येही बदल करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत चर्चा सुरू होती. त्यामुळे बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अंतिम निर्णय सभेपूर्वी जाहीर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा परिषदेत स्थायी, जलसंधारण, अर्थ, शिक्षण, बांधकाम, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, समाजकल्याण, महिला व बालकल्याण अशा दहा समित्या आहेत. स्थायी समितीला अधिक महत्त्व आहे. अर्थ, शिक्षण, बांधकाम, आरोग्य, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण या सहा समित्यांमध्ये प्रत्येकी आठ सदस्य निवडून दिले जातात. कृषी समितीत १० सदस्य, तर समाजकल्याण समितीत ११ सदस्य निवडून द्यायचे आहेत. समाजकल्याण समितीत अनुसूचित जातीमधील ५ अणि नागरिकांच्या मागास प्रवर्गातील ४ सदस्य आवश्यक आहेत. सर्वसाधारण प्रवर्गातून निवडून आलेले १९ सदस्य, सर्वसाधारण महिला प्रवर्गातून १८ सदस्या आहेत. अनुसूचित जातीचे ७ सदस्य आहेत. नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे १६ सदस्य आहेत. एकोणीस सदस्यांना दोन समितीत सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. पंचेचाळीस सदस्यांना एकाच समितीत संधी मिळणार आहे, दोन समित्यांसाठी काही सदस्यांनी नेत्यांकडे फिल्डिंग लावली होती. (प्रतिनिधी)निवडणुकांची वेळ येणार नाही : देशमुखजिल्हा परिषदेच्या चार सभापतींच्या निवडी बिनविरोध करण्यात भाजपला यश आले होते. त्याच धर्तीवर काँग्रेस व राष्ट्रवादीशी समित्या वाटपातही समझोता करून सर्व निवडी बिनविरोध होतील. निवडणुका घेण्याची वेळ येणार नाही, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी दिली.
सुहास बाबर यांच्याकडे ‘कृषी, पशुसंवर्धन’च
By admin | Published: April 20, 2017 12:11 AM