लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाजवळ तरुणाने झाडावर चढत आत्महत्या करत असल्याचे सांगितल्याने धांदल उडाली. पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यास खाली उतरवले. तो मुंबईतील असून त्याने हे कृत्य का केले याचा उलगडा होऊ शकला नाही. रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसात चौकशी सुरू होती.
मुंबईतील सुनील विश्वकर्मा हा तरुण बुधवारी सायंकाळच्या सुमारास शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाजवळच्या झाडावर चढला. अगोदरच वर्दळ असलेल्या या भागात अचानक तरुण झाडावर चढल्याने व त्याने आत्महत्या करत असल्याचे सांगितल्याने गर्दी झाली. याच दरम्यान, नागरिकांनी शहर पोलिसांना माहिती दिली व अग्निशमन दलासही निरोप देण्यात आला. दोन्ही पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. यावेळी त्याला बोलण्यात गुंतवून ठेवत महापालिकेच्या अग्निशमन दलाचे प्रमुख चिंतामणी कांबळे यांच्या नेतृत्वाखालील विक्रम घाडगे, इकबाल मुल्ला, अजित सावंत, अशोक माने आदींनी त्याला झाडावरून खाली घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी सुरू केली आहे. त्याने आत्महत्येचा प्रयत्न का केला याची माहिती मिळू शकली नाही.