लोणंद : खंडाळा तालुक्यातील पाडेगाव मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था संचलित समता आश्रमशाळा कनिष्ठ महाविद्यालयात दहावीतील विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. अक्षता लक्ष्मण पढेर (वय १६, रा. पर्वती, जनता वसाहत, पुणे, सध्या रा. आश्रमशाळा, पाडेगाव) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, अक्षता पढेर हिने तीन वर्षांपूर्वी आठवीत शिक्षण घेण्यासाठी आश्रमशाळेत प्रवेश घेतला होता. अक्षता ही शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास अंघोळीसाठी खाली गेली असता तिला लवकर गरम पाणी पाहिजे होते आणि मुलींनी तिला नंबर दिला नाही. याचा अक्षताला राग आला. त्यामुळे ती रडत खोलीत गेली. अक्षता हिने खोलीतील लहान बहीण आणि मैत्रिणीला ‘खोलीमध्ये साफ-सफाई करायची आहे. तुम्ही दोघी खाली जाऊन झाडू आणा,’ असे सांगितले. त्यानंतर खोलीला आतून कडी लावली. बाहेरून आवाज देऊन बराच वेळ झाला तरी अक्षता दार उघडत नाही म्हणून त्यांनी शिक्षकांना बोलावले. त्यांनी दरवाजाची कडी धक्के मारून तोडली असता अक्षताने खिडकीच्या अँगलला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी समाजकल्याण अधिकारी जे. एच. डोंगरे, साहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप भोसले, पोलिस उपनिरीक्षक आर. एन. साळुंखे यांनी भेट देऊन पंचनामा केला. याची लोणंद पोलिस ठाण्यात नोंद झाली असून, सहायक पोलिस निरीक्षक संदीप भोसले तपास करीत आहेत. (वार्ताहर)मैत्रिणीनेही केली होती आत्महत्याअक्षताला दहावीच्या अभ्यासाचा तणाव होता. तसेच तिची जवळची मैत्रीण पूनम कांबळे (रा. पुणे) या दोघी भोर तालुक्यातील पांगारी येथील शाळेत २०१३ मध्ये एकत्र शिक्षण घेत होत्या. परंतु तिची मैत्रीण पूनम हिनेही पुण्यात आत्महत्या केली होती. त्यामुळे ती कोणत्याही कारणास्तव किंवा मैत्रिणीची सतत आठवण काढून ‘मी माझे जीवन संपवणार,’ असे सतत सांगत होती, अशी माहिती अक्षताची आई गीता पढेर यांनी पोलिसांना सांगितली.
दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
By admin | Published: February 24, 2017 11:36 PM