तासगाव : तासगाव-गोटेवाडी रस्त्यावर पोखर्णी तलाव परिसरात एका चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाने आत्महत्या केली. आज, रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सचिन शिवाजी साळे (वय २४, रा. सरस्वतीनगर, वासुंबे, ता. तासगाव) व अर्चना राजू कुंभार (३५, मूळ रा. अथणी, सध्या रा. तासगाव) अशी दोघांची नावे आहेत. दोघेही विवाहित आहेत.दोघांनी आज दुपारीच गळफास घेतल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली. त्यानंतर या भागातील शेतकरी, नागरिक घटनास्थळी दाखल झाले. बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.खिशात सापडलेल्या दुचाकी परवान्यावरून सचिन साळेची, तर अर्चना कुंभार हिची मोबाईलमुळे ओळख पटली. बऱ्याच वेळानंतर दोन्ही मृतांचे नातेवाईक घटनास्थळी हजर झाले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयातही दोन्ही मृतांच्या नातेवाइकांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती तासगाव शहरात पसरताच खळबळ उडाली.मृत सचिन साळे व अर्चना कुंभार यांचे बऱ्याच दिवसांपासून प्रेमसंबंध होते. सचिन साळे याचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला आहे, तर अर्चना कुंभार हिचा पंधरा वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. सचिन साळे हा सरस्वतीनगरमधील झोपडपट्टी भागात राहात होता. तासगावात तसेच वासुंबे परिसरात टीव्ही डीश बसविण्याचे काम तो करत होता. सुरुवातीला मृत अर्चनाही याच भागात राहण्यास होती. अर्चनाचे मूळ गाव अथणी (जि. बेळगाव) असून, सुमारे तीन वर्षांपासून सरस्वतीनगर परिसरात मुलांच्या शिक्षणाच्या निमित्ताने ती राहायला होती. काही दिवसांपूर्वीच त्यांनी सरस्वतीनगर येथील घर सोडले होते. आत्महत्येच्या घटनेने दोन्ही कुटुंबीयांना धक्का बसला आहे. रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदनाचे सुरू होते. घटनास्थळाची पोलीस निरीक्षक रमेश बनकर यांच्यासह पोलिसांनी पाहणी केली. फिर्याद सचिनचे चुलते प्रल्हाद साळे यांनी दिली. प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले असले तरी त्यामागचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. (वार्ताहर)
प्रेमीयुगुलाची झाडाला गळफासाने आत्महत्या
By admin | Published: January 05, 2015 12:53 AM