सांगली : कसबेडिग्रज (ता. मिरज) येथे बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. विद्या हणमंतगोंडा बिरादार (वय २२, मूळ रा. व्हकुंडी, ता. बबलेश्वर) असे विवाहितेचे नाव असून, काही दिवसांपूर्वी कोरोनाने मावशीच्या झालेल्या निधनामुळे ती मानसिकदृष्ट्या तणावात होती. याच तणावातून तिने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मयत विद्या हिचा व्हकुंडी येथील तरुणाशी चार वर्षांपूर्वी विवाह झाला होता. तो कर्नाटक परिवहन विभागात वाहक म्हणून कार्यरत आहे. बाळंतपणासाठी ती काही महिन्यांपूर्वी कसबेडिग्रजला माहेरी आली होती. तिला दोन महिन्यांचे मूल आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तिच्या मावशीचे कोरोनाने निधन झाले. या घटनेपासून विद्या तणावात होती. याच तणावातून गुरुवारी पहाटेच्या सुमारास घराजवळच असलेल्या विहिरीत उडी घेऊन तिने आत्महत्या केली. घटना समजताच सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
चौकट
दोन महिन्यांचे बाळ पोरके
कोराेनाने मावशीच्या झालेल्या निधनानंतर मयत विद्या मानसिक तणावात होती. याच तणावातून तिने हे कृत्य केले असले तरी कोरोना आणि त्याच्या तणावामुळे दोन महिन्यांचे बाळ मात्र मातृप्रेमाला पोरके झाले.