सांगली : येथील विश्रामबाग परिसरातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणाने घरातील पंख्याला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. गोविंद वैभव माने (वय २१, रा. लिमये मळा, सांगली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, तो मुंबईमधील नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होता. बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. विश्रामबाग पोलीस ठाण्यात घटनेची नोंद असून, नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मृत गोविंद सांगलीतील नामांकित डॉक्टर दाम्पत्य वैभव व माधुरी माने यांचा मुलगा असून तो वैद्यकीय शिक्षणासाठी मुंबईमध्ये होता. महाविद्यालयास सुटी असल्याने तो सांगलीत आला होता. बुधवारी दुपारी जेवण करून तो बंगल्यातील दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या त्याच्या रूममध्ये गेला होता. सायंकाळी तो खाली न आल्याने कुटंबीयांनी त्यास मोबाईलवर फोन केला. कॉल करूनही तो प्रतिसाद देत नसल्याने कुटुंबीय वरच्या मजल्यावर गेले असता, पंख्याला नायलॉन दोरीने गळफास घेतल्याचे त्यांना दिसले.
घटनेची माहिती मिळताच, विश्रामबाग पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.
बॅडमिंटनचा उत्तम खेळाडू असलेल्या व वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या गोविंदने आत्महत्या केल्याने कुटुंबीयासह सर्वांनाच धक्का बसला. नैराश्यामुळे त्याने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.