सांगली : पत्नीला कामे लावतात म्हणून तिला सासरी परत पाठविण्यास नकार देत वारंवार मानसिक त्रास दिल्यामुळे जावयाने आत्महत्या केली. जुबेर सलीम चौगुले (वय ३०, रा. लक्ष्मीनारायण कॉलनी, सांगली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून याप्रकरणी जुबेरचे वडील सलीम चौगुले यांनी मुलाचे सासरे रमजान सय्यद, पत्नीची आत्या, पत्नीचा चुलतभाऊ मोहसीन शेख आणि साडू मोहसीन शेख या चौघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील डी-मार्टच्या पाठीमागे राहण्यास असलेल्या मृत जुबेर चौगुले याचा सुमय्या हिच्याशी विवाह झाला होता. जुबेरची पत्नी घरातील कोणतीच कामे करत नसल्याने त्याने तिच्या घरच्यांना याबाबत सांगितले होते. यानंतर सुमय्याचे वडील, आत्या, मोठ्या बहिणीचा पती मोहसीन शेख आणि चुलतभाऊ मोहसीन शेख चौगुले यांच्या घरी आले.‘तुम्ही आमच्या मुलीला व्यवस्थित सांभाळत नाही, त्यामुळे आम्ही तुमच्या घरी मुलीला पाठविणार नाही. आम्हाला मुलगा नसल्याने नातू सुबहान याला तुमच्याकडे ठेवणार नाही, आम्ही त्याला सांभाळणार आहोत,’ असे त्यांनी सांगितले होते. अखेर सासरच्या लोकांनी दिलेल्या त्रासामुळे ३० मे रोजी जुबेर याने घरी आत्महत्या केली. त्यानंतर जुबेरच्या वडिलांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघाविरोधात विश्रामबाग पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
Crime News Sangli: सासुरवाडीच्या त्रासाला कंटाळून जावयाची आत्महत्या, चौघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2022 3:44 PM