सांगली : कौटुंबिक वादातून अमृतवाडी (ता. जत) येथील प्रियांका रामचंद्र बाबर (वय २८) हिने मुलगा आशिष (४ वर्षे) याच्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. शनिवारी रात्री ही घटना घडली. विहिरीतील पाण्याचा उपसा करून रविवारी सकाळी दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. कौटुंबिक वादातून प्रियांकाने आत्महत्या केल्याचे जत पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.देसारहट्टी (ता. अथणी) माहेर असलेल्या प्रियांकाचा दहा वर्षापूर्वी अमृतवाडीतील रामचंद्र बाबर याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर मुलगी ऐश्वर्या (७ वर्षे) व मुलगा आशिष ही दोन अपत्ये झाली. रामचंद्र हा शेती करतो. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरू होते. शनिवारी सायंकाळी याच कारणावरुन कडाक्याचे भांडण झाले. प्रियांका रागाच्या भरात आशिषला घेवून घराबाहेर पडली. गावातील कृष्णा बाबर यांच्या विहिरीत उडी टाकून तिने आत्महत्या केली. रात्री उशिरा हा प्रकार उघडकीस आली. पण गावात भारनियमन सुरु असल्याने मृतदेह काढणे अशक्य बनले होते. तरीही ग्रामस्थांनी प्रयत्न सुरु ठेवले होते. विहिरीला पायऱ्या नसल्याने खाली उतरणेही अवघड झाले होते. अखेर रविवारी सकाळी दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. जत पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.विहीर ८० फूटकृष्णा बाबर यांची विहिर ८० फूट खोल आहे. सध्या केवळ २७ फूट पाणी आहे. विहिरीला पाय-या नसल्याने आत उतरणे अवघड होते. यासाठी रविवारी सकाळी इलेक्ट्रिक मोटार लाऊन पाण्याचा उपसा करण्यात आला. सर्व पाणी काढल्यानंतर काही तरुण विहिरीत उतरले. दोरखंडाच्या मदतीने प्रियांका व आशीषचा मृतदेह बाहेर काढले.
विवाहितेची मुलासह विहिरीत आत्महत्या, पाण्याचा उपसा करून मृतदेह बाहेर काढले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2018 2:03 PM