सांगली : माधवनगर रस्त्यावरील पंचशीलनगरमध्ये पूजा राजेश चौगुले (वय २०) या विवाहितेने तिची तीन वर्षांची मुलगी सृष्टी हिच्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.लग्नात हुंडा म्हणून तिच्या माहेरकडील लोकांनी दुचाकी न दिल्याने सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती व सासूला अटक केली आहे.पती राजेश मिलन चौगुले (वय २९) व सासू लक्ष्मी ऊर्फ बाळाबाई मिलन चौगुले (४५, दोघे रा. सदलगा, कर्नाटक, सध्या पंचशीलनगर, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. चौगुले कुटुंब मूळचे कर्नाटकातील आहे. गेल्या एक वर्षापासून ते पंचशीलनगरमध्ये भाड्याने खोली घेऊन राहत होते. पूजाचे नेज (ता. चिकोडी) माहेर आहे. २०१२ मध्ये तिचा राजेश चौगुले याच्याशी विवाह झाला होता. त्यांना सृष्टी ही मुलगी होती. पूजाचा पती सेंट्रिंग काम करतो. शनिवारी सायंकाळी पूजा सृष्टीला घेऊन घरातून बाहेर पडली होती. रात्री उशिरापर्यंत ती घरी न आल्याने घरच्यांनी तिचा परिसरात शोध घेतला. पण कुठेच सुगावा लागला नाही. रविवारी सकाळी पंचशीलनगरमधील विकासनगरमध्ये महापालिकेच्या खुल्या भूखंडावरील विहिरीत काही मुले पोहायला गेली होती. त्यावेळी पूजा व सृष्टीचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला.संजयनगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ‘जीवनरक्षक टीम’ला पाचारण करण्यात आले. विहिरीत पाणी खूप होते. पन्नास फूट अंतरावर मृतदेह होते. दोन तासांच्या प्रयत्नानंतर दोघींचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पूजाने मुलीसह आत्महत्या केल्याचे वृत्त समजताच तिचा पती, सासू, सासरे व दीर घटनास्थळी दाखल झाले. पूजाचे माहेरकडील लोकही दाखल झाले. त्यांनी आक्रोश केला. पूजाच्या माहेरकडील लोकांनी सासरच्या लोकांशी वाद घातल्याने तणाव निर्माण झाला. त्यामुळे पोलिसांनी सासरच्यांना ताब्यात घेतले. सांगलीच्या शासकीय रुग्णालयात विच्छेदन तपासणी करुन दोघींचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.दुचाकी दिली नाहीपूजाच्या विवाहावेळी तिच्या सासरच्या लोकांनी हुंडा म्हणून नवीन दुचाकी मागितली होती; पण तिच्या माहेरकडील लोकांच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना दुचाकी खरेदी करून देता आली नाही. त्यामुळे पती व सासू तिचा छळ करीत होते. त्याला कंटाळून तिने मुलीसह आत्महत्या केल्याची फिर्याद पूजाची आई संगीता आनंदा दाभाडे (रा. नेज, ता. चिकोडी) यांनी संजयनगर पोलिसांत दिली आहे. यावरून पती व सासूला अटक केली आहे.
सांगलीत विवाहितेची मुलीसह विहिरीत आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 11:58 PM