लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : तुंग (ता. मिरज) येथील अल्लाबक्ष हनीफ सुतार (वय ५७) या शेतकऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. घटनेची रात्री उशिरा सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली. अल्लाबक्ष सुतार कुटुंबासह पत्र्याच्या शेडमध्ये राहत होते. त्यांना केवळ दहा गुंठे शेतजमीन आहे. शेतातून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने ते सुतार काम करीत होते. तसेच शेतात मजुरीसाठी जात होते. त्यांना किरकोळ कर्ज होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्यांनी गावातच सरबत विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. पण वादळी वाऱ्यामुळे हाव्यवसाय उद्ध्वस्त झाला होता. गेल्या काही दिवसांपासून ते चिंताग्रस्त होते. यातून ते रविवारी सायंकाळी घरातील लोक कामात असताना घराबाहेर आले. घराच्या आडोशाला जाऊन त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केले. त्यांना उलट्याचा त्रास होऊ लागल्यानंतर घरचे लोक बाहेर आले. तोपर्यंत प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी भेट दिली. सांगलीच्या शासकीय रुग्णालयात विच्छेदन तपासणी करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत आत्महत्येचे निश्चित कारण स्पष्ट झाले नव्हते.
तुंगमध्ये शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या
By admin | Published: June 12, 2017 1:01 AM