मिरज : मिरजेतील एका माजी नगरसेवकाच्या पुतण्याविरुद्ध बलात्काराची फिर्याद देणाऱ्या विवाहितेने शनिवारी रात्री आत्महत्या केली. मृत विवाहितेच्याविरुद्ध खंडणीची तक्रार देणाऱ्या तिघांविरुद्ध तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला. संशयितांना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाइकांनी नकार दिला. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. या विवाहित तरुणीने तिचा नातेवाईक असलेल्या अमित अण्णासाहेब कुरणे याच्याविरुद्ध एक महिन्यापूर्वी बलात्काराची फिर्याद दिली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून अमित फरार आहे. या घटनेनंतर या विवाहितेला तिच्या सासरच्या मंडळींनी स्वीकारण्यास नकार दिल्याने तिने दि. २ आॅगस्टपासून संशयित अमितच्या शेतातील घरात जाऊन वास्तव्य केले होते. ‘शेतातून निघून जा, अन्यथा गुन्हा दाखल करतो’, अशी धमकी अण्णासाहेब कुरणे व त्याची पत्नी सुनीता कुरणे यांनी दिल्याची या विवाहितेने तक्रार केली. तिने कुरणे यांच्या घरातून जाण्यास नकार दिल्यानंतर, सुनीता कुरणे यांनी, या विवाहितेने तुमच्यावरही बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत दहा लाखांच्या खंडणीची मागणी केली असल्याची पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी याप्रकरणी या विवाहितेविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला. कुरणे दाम्पत्य ताब्यात रात्री उशिरा पोलिसांनी महादेव तम्माण्णा कुरणे (वय ६0) व त्यांची पत्नी सुनीता (५५) यांना ताब्यात घेतले. याबाबतची माहिती मृत विवाहितेच्या नातेवाईकांना देण्यात आली. त्यानंतर नातेवाईकांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान, या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात आल्याची माहिती उपअधीक्षकांनी दिली.
बलात्काराची तक्रार देणाऱ्या विवाहितेची मिरजेत आत्महत्या
By admin | Published: August 07, 2016 11:48 PM