शीतल पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली :सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी काँग्रेसचे सुजय अशोकराव शिंदे (जत) यांची तर उपसभापतीपदी रावसाहेब राजाराम पाटील (कवठेमहांकाळ) यांची बिनविरोध निवड झाली. शिंदे हे जतचे आमदार विक्रम सावंत यांचे तर पाटील हे माजीमंत्री अजितराव घोरपडे यांचे समर्थक आहेत. निवडीनंतर काँग्रेस समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.
बाजार समितीच्या वसंतदादा पाटील सभागृहात सभापती निवडीसाठी विशेष सभा झाली. जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. सत्ताधारी गटाचे नेते आमदार विक्रम सावंत, माजी मंत्री अजितराव घोरपडे, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.
नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी व घोरपडे यांच्या महाआघाडीने भाजपचा पराभव करीत सत्ता काबीज केली होती. त्यामुळे सभापती आणि उपसभापती निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. गुरुवारी सकाळी जिल्हाध्यक्ष आ. सावंत, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, राष्ट्रवादीचे जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील यांच्यात बैठक झाली. बैठकीत जत तालुक्याला सभापतीपद देण्यावर शिक्कामोर्तब झाले.
जत तालुक्यातून शिंदे यांचा एकमेव अर्ज दाखल होता. अर्जाला शशिकांत नागे सूचक व बाबगोंडा पाटील यांनी अनुमोदक होते. उपसभापती पदासाठी रावसाहेब पाटील यांच्या अर्जाला शकुंतला बिराजदार या सूचक राहिल्या. तर बिराप्पा शिंदे हे अनुमोदक आहेत. निवडीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सुरवसे यांनी नूतन पदाधिकार्यांचा सत्कार केला. यावेळी नूतन संचालक संग्राम पाटील, आनंदराव नलवडे, रमेश पाटील, बापूसो बुरसे, स्वप्नील शिंदे, बाबासाहेब माळी, महेश पवार, रामचंद्र पाटील, कुसुम कोळेकर, सचिव महेश चव्हाण उपस्थित होते.
पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल एक वर्षाचा
सत्ताधारी नेत्यांनी जास्तीत जास्त संचालकांना संधी देण्यासाठी प्रत्येक वर्षाला सभापती, उपसभापतीपदावर नव्याने संधी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सावंत यांनी सांगितले.