शीतपेयांकडे नागरिकांचे दुर्लक्ष
सांगली : तापमान वाढले तरी कोरोनाच्या भीतीने यंदा शीतपेयांकडे नागरिक दुर्लक्ष करीत असल्याचेच दिसत आहे. तसेच लाॅकडाऊन असल्याने अनेक दुकानदारांनी शीतपेयांची खरेदीही केली नाही.
आटपाडी तालुक्यात उद्योगांचा वानवा
करगणी : आटपाडी तालुक्यात मोठ्या उद्योगांची वानवा आहे. त्यामुळे शहरातील व तालुक्यातील बेरोजगारांना कामाच्या शोधात महानगरांकडे धाव घ्यावी लागत आहे. बहुतांश जनता शेतीवरच अवलंबून आहे. मात्र ओलिताअभावी आता शेती कसणेही अवघड झाले आहे.
पीककर्ज रकमेची मर्यादा वाढवा
सांगली : कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे पीककर्ज रकमेची मर्यादा वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. विशेष म्हणो, कापूस, सोयाबीन, तूर, धान आदी पिकांच्या लागवडीकरिता मोठ्या प्रमाणात पैसा लागत असला, तरी पीककर्ज मात्र मर्यादित भेटत असल्यामुळे शेतकऱ्यांना तडजोड करावी लागत आहे.
मशागतीची कामे अंतिम टप्प्यात
सांगली : खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांची तयारी पूर्ण असून येत्या आठवड्यात पेरणीला सुरुवात होईल, अशी परिस्थिती आहे. वाळवा, पलूस, तासगाव तालुक्यात ज्वारी, सोयाबीनचीही मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. खरीप हंगाम अगदी काही दिवसांवर आला असल्याने शेतकऱ्यांनी कोरोनाच्या दहशतीमध्ये मशागतीची कामे सुरू केली आहे. उन्हामुळे शेतकरी पहाटेच शेतात जात असून, दुुपारपर्यंत घरी येत आहे.
वीज खांबामुळे अपघाताचा धोका
सांगली : शहरातील अनेक वॉर्डांतील रस्त्यालगत असलेले वीज खांब गंजले आहेत. सदर खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा खांब बदलविण्याची मागणी होत आहे. यापूर्वी अनेकदा सदर खांब बदलविण्याची मागणी नागरिकांकडून झाली आहे. परंतु याकडे दुर्लक्ष झाले.
शेतकऱ्यांची चिंता वाढली
सांगली : जिल्ह्यात ज्वारी, बाजारी पिकाच्या क्षेत्रात दिवसेंदिवस घट होत आहे. त्यामुळे कडब्याची टंचाई भासत असून, कडब्याच्या एका पेंडीला ४० ते ५० रुपये मोजावे लागत आहेत. परिणामी पशुधन सांभाळायचे कसे, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
घरकुलांची कामे झाली ठप्प
सांगली : जिल्ह्यातील शासकीय कामे व घरकुलांची कामे मंजूर करण्यात आली आहे. मात्र वाळूअभावी ही कामे ठप्प झाली आहेत. घरकुलांची सुरू झालेली कामे पूर्णत: ठप्प झाली आहेत.
नाल्यांना झुडपांचा वेढा
सांगली : शहरातील बहुतांश नाल्यांत मोठ्या प्रमाणावर झुडपे वाढली आहे. पावसाचे दिवस तोंडावर आल्यामुळे महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन नाल्यातील झुडपांची स्वच्छता करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
पोलीसपाटलांना मानधनाची प्रतीक्षा
सांगली : ग्रामीण भागात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पोलीसपाटलांचे मानधन मागील चार महिन्यांपासून थकीत आहे. परिणामी पोलीसपाटलांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्वरित मानधन देऊन आर्थिक कोंडी सोडवावी, अशी मागणी केली जात आहे.
कोरोना प्रतिबंधक साहित्याची मागणी वाढली
सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असली, तरी सुज्ञ नागरिकांकडून पुरेपूर काळजी घेतली जात आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक साहित्याची मागणीही वाढली आहे. हे साहित्य विक्रीसाठी अनेकांनी जागोजागी दुकाने थाटले आहेत. नागरिकांकडून मास्क वापरण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याने मास्कची विक्री वाढली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
कर्ज हप्त्यांना स्थगिती देण्याची मागणी
सांगली : कोरोनाच्या कालावधीत अनेकांचे व्यवसाय, उद्योगधंदे बंद पडले आहेत. हातावर पोट असणाऱ्यांची तर अक्षरश: उपासमार होत आहे. अशा परिस्थितीत फायनान्स, बँक, बचत गटांच्या कर्जाचे हप्ते फेडायचे कसे? असा प्रश्न अनेकांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीत कर्जाच्या हप्त्यांना स्थगिती द्यावी, अशी मागणी होत आहे.