अशोक पाटील ल्ल इस्लामपूरगेल्या ३१ वर्षात पालिकेच्या राजकारणात आ. जयंत पाटील यांनी ‘एकला चलो’ची भूमिका पार पडली आहे. जो आडवा येईल, त्याचा ‘करेक्ट कार्यक्रम’ही केला आहे. आताही उपनगराध्यक्ष निवडीवेळी बेरीज-वजाबाकीच्या राजकारणात त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने उपनगराध्यक्ष पदासह दोन स्वीकृत नगरसेवक मिळवले. त्यामुळे आता शहराच्या विकासावेळी दोन्ही गटात काट्याचा संघर्ष होणार आहे. नगरपालिकेवरील राष्ट्रवादीची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी आमदार जयंत पाटील यांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले. आ. पाटील यांच्या प्रयत्नांनी राष्ट्रवादीने गड जिंकला असला तरी, विजयभाऊ पाटील यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याला नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी करता आले नाही. विकास आघाडीचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यामुळेच आघाडीची ताकद वाढली, याची सल आमदार पाटील यांना होती. त्यामुळेच त्यांनी कोणत्याही परिस्थितीत उपनगराध्यक्ष पदासह सभापतीपदे राष्ट्रवादीकडे ठेवण्यासाठी चंग बांधला. त्यामध्ये त्यांना यश आल्याचे बुधवारी झालेल्या निवडीवरून स्पष्ट झाले आहे.राष्ट्रवादीने दादा पाटील या अपक्षाला उपनगराध्यक्ष केले. दादा पाटील यांच्यामुळे राष्ट्रवादीमध्ये दोन स्वीकृत नगरसेवकांची भर पडली. त्यामुळे त्यांची सभागृहातील संख्या १७ झाली आहे, तर विकास आघाडीकडे नगराध्यक्षांसह १५ संख्याबळ झाले आहे. विकास आघाडीने जाहीरनाम्यात इस्लामपूर शहरासाठी विविध योजना आणि विकासाच्या घोषणा केल्या आहेत. परंतु विकासाची कामे सभागृहात मंजूर करताना खडाजंगी होणार आहे. या सर्वांना बरोबर घेऊन जाताना मात्र नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.प्रेमाखातर विकास आघाडीला मदत ज्येष्ठ माजी नगरसेवक एल. एन. शहा म्हणाले, उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडीमध्ये दोन्ही गटांनी स्वार्थ साधला आहे. अशोकदादा पाटील यांच्या प्रेमाखातर विकास आघाडीला आपण मदत केली आहे. आपल्याला कोणत्याही पदाचा हव्यास नाही. येणाऱ्या काळात कोणत्याही पक्षात न जाता जनतेची कामे करण्यासाठी आपण उपलब्ध राहणार आहोत.
बेरीज-वजाबाकीत राष्ट्रवादी सरस
By admin | Published: January 04, 2017 11:05 PM