सांगली : टेंभू योजनेच्या सुधारित प्रस्तावात तासगाव, कवठेमहांकाळसह इतर तालुक्यांतील गावांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रस्तावाला दीड महिन्यात मंजुरी मिळणार आहे. राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांना मुलगा रोहित पाटील याच्या राजकीय भवितव्यात अडचण वाटत आहे. त्यासाठी त्यांनी महात्मा गांधी जयंतीपासून उपोषण करण्याचा इशारा दिल्याची टीका भाजपचे खासदार संजय पाटील यांनी पत्रकार बैठकीत केली.सावळज परिसरातील आठ गावांचा टेंभू योजनेत समावेश करावा, यासाठी सुमनताई पाटील २ ऑक्टोबरपासून उपोषण करणार आहेत. त्याबाबत पाटील म्हणाले की, गेली ४४ वर्षे त्यांच्या घराण्यात सत्ता आहे. जिल्हा परिषद सदस्यापासून उपमुख्यमंत्रीपदापर्यंत त्यांच्या घराण्याने मजल मारली. पण त्यांना सावळज परिसरातील गावांना पाणी देता आलेले नाही. उलट संबंधित गावात बैठक घेऊन टेंभूच्या विस्तारित योजनेत गावांचा समावेश केला. हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. आमदारपुत्रांनी या गावांचा समावेश झाल्याची घोषणा २०२२ मध्ये केली होती. पण ते पाणी आणू शकले नाहीत. आपले अपयश झाकण्यासाठी उपोषणाचे नाटक सुरू आहे.टेंभूच्या सुधारित प्रस्तावात तासगाव, कवठेमहांकाळमधील प्रत्येकी आठ, आटपाडी, १२, जत ४, खानापूर १५ यासह माण १९, खटाव २८, सांगोला तालुक्यातील १० गावांचा समावेश करण्यात आला आहे. सुधारित प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर जिल्ह्यातील ३१ हजार हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणार आहे. श्रेयवादासाठी आमदारांनी जनतेची दिशाभूल सुरू केली आहे. त्यांच्या घराण्याने ४४ वर्षात दिलेल्या आश्वासनाचा लेखाजोखा करण्याची तयारीआहे. त्यांनी उपोषणाचा केविलवाणा प्रयत्न करू नये, अन्यथा आम्हाला सगळ्या बाबी उघड्या कराव्या लागतील, असा इशाराही पाटील यांनी दिला.
रोहित पाटलांच्या भविष्यासाठी सुमनताईंचे आंदोलन, खासदार संजय पाटील यांची टीका
By शीतल पाटील | Published: September 29, 2023 7:16 PM