सांगली : मध्य महाराष्ट्रासह काही भागांवर असलेले चक्रवात आता विरल्याने थंडी व लहरी हवामानाचा धोका टळला आहे. दुसरीकडे, तापमानात वाढ होत असून उन्हाळा सक्रिय होत आहे.
फेब्रुवारी महिन्यात चक्रवातामुळे लहरी हवामानाचा सामना नागरिकांना करावा लागला. कधी थंडी, कधी पाऊस, कधी धुके तर कधी सामान्य तापमान अशा विचित्र हवामानातून नागरिकांना जावे लागले. चक्रवात संपल्याने आता वातावरण सामान्य झाले आहे. उन्हाळ्याची चाहूल वाढत्या तापमानातून मिळत आहे. शनिवारी जिल्ह्याचे सरासरी कमाल तापमान ३५, तर किमान तापमान २० अंश सेल्सिअस नोंदले गेले. भारतीय हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार मराठवाड्याच्या बहुतांश भागांसह मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
सरासरीपेक्षा तापमान अधिक नोंदले जात असून, तापमानवाढीचा हा आलेख असाच वाढत जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मार्च महिन्याची सुरुवात उन्हाच्या झळांनी होणार आहे. उन्हाळा आता उंबरठ्यावर आला आहे.
यंदा चक्रवातामुळे उन्हाळा उशिरा सुरू होत आहे. नेहमी फेब्रुवारीत होणारी उन्हाळ्याची सुरुवात मार्चपासून होत आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्याच्या बहुतांश भागात आकाश निरभ्र राहणार आहे.