लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : शिराळा नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षा म्हणून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सुनंदा गजानन सोनटक्के यांची निवड निश्चित झाली आहे. भाजपने नगराध्यक्षपदासाठी असणारे दोन्ही उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने सोनटक्के नगराध्यक्षपदी विराजमान होत आहेत. याची अधिकृत घोषणा गुरुवार, दि. १५ रोजी होणार आहे. या निवड निश्चितीमुळे राष्ट्रवादीकडून गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.मंगळवारी दुपारी चारपर्यंत नगराध्यक्षपदाच्या उमेदवारी अर्ज माघारीची मुदत होती. या पदासाठी राष्ट्रवादीतर्फे सुनंदा सोनटक्के, भाजपतर्फे अॅड. नेहा सूर्यवंशी, स्मिता कदम असे एकूण तीन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. मंगळवारी भाजपच्यावतीने अॅड. सूर्यवंशी व कदम या दोन्ही उमेदवारांचे अर्ज माघारी घेण्यात आले. अर्ज छाननीवेळी अॅड. सूर्यवंशी यांनी सोनटक्के यांच्या अर्जाबाबत तक्रार केली होती. त्यावेळी ही तक्रार फेटाळण्यात आली होती. त्यामुळे भाजप पुढील न्यायालयात दाद मागणार का? भाजपतर्फे कोणाचा उमेदवारी अर्ज राहणार, अशी चर्चा होती. मात्र अनपेक्षितपणे दोन्ही अर्ज काढून घेतल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.मंगळवारी भाजपने दोन्ही उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सुनंदा सोनटक्के यांचा एकच अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची नगराध्यक्ष म्हणून निवड निश्चित झाली आहे. औपचारिक घोषणा गुरुवार, दि. १५ रोजी होणार आहे. ग्रामपंचायत बरखास्त झाली, त्यावेळी सरपंचपदी गजानन सोनटक्के होते, तर आता त्यांच्या पत्नी सुनंदा पहिल्या नगराध्यक्षा म्हणून विराजमान झाल्या आहेत. रिक्षा व्यावसायिक असणाऱ्या सोनटक्के यांच्या कुटुंबात सरपंचपद तसेच आता नगराध्यक्षपद मिळाले आहे.
शिराळ्याच्या नगराध्यक्षपदी सुनंदा सोनटक्के बिनविरोध
By admin | Published: June 13, 2017 11:44 PM