सांगली : हौशी चित्रकार महिलांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन रविवारी (दि. २१) भरवण्यात येत आहे. डॉक्टर, शिक्षिका, व्यावसायिक, गृहिणी अशा विविध क्षेत्रातील महिलांची चित्रे प्रदर्शनात मांडली जातील. मृणाल नाटेकर यांनी आयोजन केले आहे.
दररोजचे संसाराचे, व्यवसायाचे, नोकरीचे व्याप सांभाळत या महिलांनी चित्रकलेचा छंद जोपासला आहे. फावल्या वेळेत उत्तमोत्तम चित्रे काढली आहेत, पण त्यांना आजवर खुले व्यासपीठ न मिळाल्याने त्यांची कला दृष्टीआडच राहिली आहे. तिला व्यासपीठ देण्याचे काम या प्रदर्शनाद्वारे होणार असल्याची माहिती नाटेकर यांनी दिली. भक्ती चितळे, हर्षा शाह, नेहा सारडा, अस्मिता कुलकर्णी, आरती परांजपे, सुनंदा कुलकर्णी, ज्योती पटवर्धन, सुखदा कुलकर्णी, ज्योती कुलकर्णी, संपदा कानिटकर, दिशा कुलकर्णी, पल्लवी फडणीस, श्रद्धा प्रताप आणि प्रांजली भिडे यांनी रेखाटलेली विविध माध्यमातील चित्रे पहायला मिळतील.
आर्किटेक्चर हॉलमध्ये होणाऱ्या प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद देण्याचे आवाहन त्यांनी केले.