विशेष म्हणजे शासकीय शिक्षण विभागही या माध्यमातुन ॲक्टिव्ह झाला आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीइआरटी) मार्फत गेल्या नोव्हेंबरपासून स्वाध्याय उपक्रमातून विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. गेले २४ आठवडे विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन टेस्ट सोडवून घेण्यात आल्या. शिवाय सह्याद्री वहिनीमार्फत 'टिलिमिली ' उपक्रम राबविण्यात आला. शासनातर्फे बालदिनानिमित्त निबंध, पत्रलेखन, चित्रकला, वक्तृत्व, पोस्टर स्पर्धा घेण्यात आल्या. 'गोष्टींचा शनिवार', 'मिसकॉल दो कहानी सुनो' अशा माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्यात आले.
शासकीय संस्था असे उपक्रम राबवीत असताना राज्यातील विविध खासगी शिक्षण संस्थाही यामध्ये मागे राहिल्या नाहीत. भिलवडी परिसरातील शिक्षक शरद जाधव यांनी ‘गोष्टींची शाळा’ उपक्रमातून मनोरंजन आणि प्रबोधनाचे उपक्रम राबविले. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवीण डाकरे व जयदीप डाकरे या शिक्षक बंधूंनी गुरुमाउली ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचविले. अशा असंख्य शिक्षकांनी राबविलेल्या उपक्रमांमुळे ऑनलाईन शिक्षण अधिक प्रभावी बनले.
कोट
कोरोनाचा प्रभाव वाढला आणि शाळा बंद झाल्या. अशा परिस्थितीत मुलांना विविध उपक्रमात सहभागी करून घेऊन शैक्षणिक प्रवाहात कायम ठेवण्याचे काम ऑनलाईन माध्यमातून झाले. बहुसंख्य मुलांनी याचा लाभ घेतला. ग्रामीण भागातील वाडीवस्तीवरील मुलांना इंटरनेट सुविधेअभावी यापासून दुर राहावे लागले याची खंत आहे; पण एकूणच विविध अंगांनी ऑनलाईन शिक्षण माध्यम कोरोनाच्या काळात शैक्षणिक उपक्रमांसाठी अपरिहार्य साधन बनले आहे.
- सुभाष कवडे, ज्येष्ठ साहित्यिक