फोटो १९ संजय कदम तासगाव
आणि
फोटो १९ संजय कदम तासगाव ०१
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर प्रकल्प संचालक म्हणून काम करणारे संजय कदम हे लोढे (ता. तासगाव) चे रहिवासी. गेल्या महिन्यात सोलापूर-विजापूर महामार्गावर २५ किलोमीटर लांबीच्या एका लेनचे डांबरीकरण १८ तासात पूर्ण करण्याचा विक्रम करत त्यांनी महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. कोरोनामुळे वर्षभर काम रेंगाळले होते. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी कदम यांच्यावर जबाबदारी सोपविली आणि ती त्यांनी पूर्णत्वाला नेलीदेखील.
५०० कर्मचारी व २५ अभियंत्यांच्या मदतीने सकाळी ६ वाजता कामाला सुरुवात झाली. ५ पेव्हर यंत्रे, २० रोलर, १० जनरेटर सेट, ५ विटमनी ब्राऊसर, १०० डंपर आणि १५ हजार टन डांबरमिश्रित खडीचा वापर झाला. बाळेपासून विजापूरपर्यंत पाच टप्प्यात एकाच वेळेस काम सुरू केले, ते पूर्ण झाल्यावरच थांबले. झपाटलेपणा, झोकून देण्याची वृत्ती, समोरच्याचे ऐकून घेण्याचा स्वभाव यामुळे संजय कदम हे नितीन गडकरींच्या टीममधील महत्त्वाचे अधिकारी बनलेत. लोढेमध्ये आई शांताबाई, वडील शिवाजी यांच्यासह कुटुंब आहे. लोढे आणि तासगावमध्ये प्रारंभीच्या शिक्षणानंतर बुधगावच्या वसंतदादा पाटील महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. १९९५ मध्ये अक्कलकोटला सार्वजनिक बांधकाममध्ये अभियंता म्हणून रुजू झाले. गुणवत्तेच्या जोरावर पदोन्नतीची शिखरे सर करत गेले. सध्या राष्ट्रीय महामार्गासाठी प्रकल्प संचालक म्हणून काम करत आहेत. सांगली, कोल्हापूरच्या विकासाचा सूर्योदय ठरणाऱ्या रत्नागिरी-सोलापूर महामार्गाची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. शासकीय सेवेत उच्च पदांवर काम करू इच्छिणाऱ्या महाराष्ट्रीयन तरुणांसाठी ते जणू आयडॉल ठरावेत.