सांगली : चालू आर्थिक वर्ष संपण्यास केवळ पंधरवडाच हाती असल्याने जिल्हा बँक प्रशासनाची पळापळ सुरू झाली आहे. बड्या दहा थकबाकीदारांकडून कर्जवसुलीस प्रतिसाद मिळत असल्याने मार्चअखेर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने गेल्या दोन वर्षापासून शासनाच्या अनेक अडचणींचे बांध तोडून सक्षमतेने कारभार केला आहे. नफ्याच्या आकडेवारीत घट झाली असली तरी, बँकेच्या कारभारावर त्याचा कुठेही परिणाम झालेला नाही. जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी शंभर कोटी नफ्याचे उद्दिष्ट दिले होते. त्याचवर्षी नोटाबंदीचा निर्णय झाला आणि रिझर्व्ह बँकेमार्फत जिल्हा बँकेची कोंडी सुरू झाली. यावर मात करीत जिल्हा बँकेने नफ्याची समाधानकारक आकडेवारी गाठली. चालू आर्थिक वर्षातही बँकेला समाधानकारक आकडा गाठता येईल, अशी परिस्थिती आहे. त्यासाठीच प्रशासनाने आता गतीने वसुलीसाठी पावले उचलली आहेत.
बड्या वीस थकबाकीदारांना नोटिसा बजावल्यानंतर यातील काही थकबाकीदारांनी पैसे जमा केले आहेत. आता बड्या थकबाकीदारांतील पहिल्या दहा संस्थांकडील थकबाकी वसुलीबाबत कडक धोरण बँक प्रशासनाने स्वीकारले आहे. या संस्थांनीही ३१ मार्चपूर्वी थकबाकी भरण्याचे मान्य केल्याचे समजते. त्यामुळे ३१ मार्चपूर्वीच या संस्थांची वसुली करून नफ्याचा अपेक्षित आकडा गाठण्याचा प्रयत्न दिसत आहे. वर्षभरात बँकेच्या एनपीए (नॉन परफॉर्मिंग असेटस्)मध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. हा एनपीएसुद्धा कमी करण्याचे आव्हान बँकेसमोर आहे.बँकेच्या संचालक मंडळाने गेल्या तीन वर्षात चांगला कारभार केला आहे. आर्थिक सक्षमता टिकविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. त्यामुळेच पदाधिकारी, संचालकांकडूनही वसुलीचा आढावा घेतला जात आहे.कारवाईत : पारदर्शीपणाजिल्हा बँकेने कर्ज देताना आणि वसुलीवेळी दुजाभाव टाळला आहे. थकबाकी असलेल्या संस्थांना नोटिसा बजावताना सर्वांनाच समान न्याय दर्शविला. त्यामुळे बँकेतील वातावरण सध्या चांगले आहे. अन्यथा कारवाईत दुजाभाव झाला असता, तर वसुलीच्या प्रक्रियेला अडथळा आला असता. त्यामुळे त्याबाबतचे पथ्य पदाधिकारी व प्रशासनाने पाळले आहे.