सांगली : नदी काठच्या गावांमध्ये पूरपरिस्थिती असून या गावांना शुध्द पाण्याचा पाणी पुरवठा होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी तालुका प्रशासनाने पूरबाधित गावांना तातडीने टँकरने शुध्द पाण्याचा पुरवठा सुरु करावा, जसजसे गावातील पाणी उतरेल तसतसे स्वच्छतेची मोहिम तातडीने राबवावी असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.जिल्हाधिकाऱ्यांची वारणा काठच्या कणेगाव, बोरगाव, जुने खेड, वाळवा व आष्टा येथे भेटी देऊन पूरस्थितीची पाहणी केली. यावेळी तहसिलदार राजेंद्र सबनिस, गट विकास अधिकारी शशिकांत शिंदे, संबधित गावांचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व पदाधिकारी उपस्थितीत होते.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, पूर परिस्थिती कमी होत असून त्यामुळे अन्य आजार उदभवण्याची शक्यता आहे. त्यासाठी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. रोगराई पसरु नये यासाठी गावांमध्ये आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. तसेच प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप संबधित ग्रामपंचायतींनी सुरु करावे. गावांना पुरविण्यात येणाऱ्या पाण्याबाबत योग्य दक्षता घेण्यात यावी. यामध्ये मेडिक्लोर टाकुन शुध्द करण्यात यावे.
शेतीचे झालेले नुकासान, घरांची झालेली पडझड, लोकांच्या घरात गेलेले पाणी त्यामुळे जिवनावश्यक वस्तुंचे झालेले नुकसान याची पाहणी करताना शासनाच्या निकषानूसार पंचनामे करताना नुकसान झालेल्या भागाच्या ठिकाणी प्रत्येक्ष भेटी देऊन वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत व त्याचा अहवाल तातडीने जिल्हा प्रशासनास करावा अशा सूचना तालूका प्रशासनाला दिल्या.