सांगली : जिल्ह्यातील ६४ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ३२० उपकेद्रांना मधुमेह, उच्च रक्तदाब, मधुमेह, सर्पदंश, श्वानदंशासह अनेक प्रकारची तीन कोटी रुपयांची औषधे सोमवारी जिल्हा परिषदेतून पाठविण्यात आली. मुख्य लेखा व वित्त अधिकारी विठ्ठल चव्हाण आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांच्या उपस्थितीमध्ये ३५ वाहनांमधून औषधे रवाना करण्यात आली.जिल्ह्यातील ६४ प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण भागासाठी आरोग्य संजीवनी ठरत आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा मिळत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या संकल्पनेतून स्मार्ट पीएचसी हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. दिलीप माने यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम जिल्ह्यात सुरू आहे. दर्जेदार रुग्णालय इमारतीबरोबरच रुग्णालयामध्ये मूलभूत सुविधा, डॉक्टरांकडून चांगले उपचार आणि मुबलक औषधेही मिळाली पाहिजेत. एकही रुग्ण रुग्णालयात औषधे नाहीत, म्हणून परत जाऊ नये, या भूमिकेतूनच जितेंद्र डुडी यांनी प्रथमच तीन कोटींची औषधे आरोग्य केंद्रांना स्थानिक पातळीवरून दिली आहेत. या औषधांमुळे रुग्णांची गैरसोय दूर झाली आहे.औषधांची टंचाई भासणार नाहीअसंसर्गजन्य रोगनियंत्रण कार्यक्रमांतर्गत उच्च रक्तदाब, मधुमेह, सर्पदंश, श्वानदंश, सर्दी, खोकला, प्रतिजैविके, रक्तवाढीच्या गोळ्या, मल्टिटॉमिनचे औषध आरोग्य केंद्रांना दिली आहेत. येत्या पंधरा दिवसांत अजूनही मोठ्या प्रमाणात औषधे उपलब्ध होणार आहेत. भविष्यात कोणत्याही प्रकारची औषधांची कमतरता भासणार नाही, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी यांनी दिली.