विटा : वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर कोरोना रूग्णांना चांगले उपचार मिळण्यासाठी विटा शहरात सुरू असलेल्या कोविड रुग्णालयात आवश्यकतेनुसार ऑक्सिजन बेडची संख्या वाढवा, असे आदेश देऊन ऑक्सिजन व रेडमीसिवीरचा पुरवठा येत्या दोन दिवसांत सुरळीत होईल, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.विटा येथील पंचायत समितीच्या सभागृहात बुधवारी कोरोनाच्या वाढत्या संसर्गाबाबत केलेल्या विविध उपाय योजना आणि स्थानिक पातळीवर कायदा व सुव्यवस्था याबाबत मंत्री शंभूराज देसाई यांनी आढावा बैठक घेतली.
यावेळी आमदार अनिल बाबर, जिल्हा पोलिस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम, पोलीस उपअधीक्षक अंकुश इंगळे, प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषिकेत शेळके, विटा पालिकेचे मुख्याधिकारी अतुल पाटील, पोलीस निरीक्षक संतोष डोके, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते, आनंदराव पवार, सभापती महावीर शिंदे यांच्यासह अन्य अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी मंत्री देसाई यांनी सध्याचा काळ हा अत्यंत कठीण काळ आहे. प्रशासनातील सर्व घटकांनी एकत्र येऊन लोकांना दिलासा देण्याची गरज आहे. पण राज्यातील लोकांनी शासनाला योग्य प्रकारे सहकार्य केले तर महिनाभरात आपण या संकटावर मात करू. विटा शहरासह खानापूर तालुक्यात संचारबंदीची कडक अंमलबजावणी करावी. कायदा मोडतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, असा आदेश यावेळी त्यांनी दिला.यावेळी तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या, विटा शहर व परिसरात रुग्णालयांची उभारलेली यंत्रणा आणि सुरू असलेले लसीकरण या बाबत माहिती दिली. तसेच सध्या सुरू असलेल्या संचारबंदी आणि लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध कठोर उपायांची माहिती दिली. त्यानंतर मंत्री देसाई यांनी संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर विट्यातील मुख्य शिवाजी महाराज चौकातील कायदा सुव्यवस्थेची आणि बंदोबस्ताची पाहणी केली.यावेळी मंत्री देसाई यांनी कोणत्याही क्षणी शासन कडक निर्बंध लागू करेल, यासाठी पोलीस दलाची बंदोबस्त, नाकेबंदी इत्यादी संदर्भाची तयारी असली पाहिजे. केंद्र शासनाने १८ वर्षावरील सर्व व्यक्तींचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे लसीकरण केंद्राच्या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लसीकरणच्या ठिकाणी गर्दी होऊ नये, याची तयारीही पोलीस यंत्रणेने करावी, असे आदेश ही दिले.