लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोना रुग्ण साहाय्यता समितीच्या व्यवस्थापनाखाली मराठा समाज संस्थेच्यावतीने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करण्यात आले असून त्याशिवाय १० जंबो सिलिंडरही रुग्णांच्या मदतीसाठी ठेवण्यात आले आहेत.
मराठा समाज भवनात मंगळवारी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून या उपक्रमाची सुरुवात मराठा समाज संस्थेचे अध्यक्ष ॲड. उत्तमराव निकम यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी उपाध्यक्ष दत्तात्रय सावंत, सरचिटणीस बाबासाहेब भोसले, ए.डी. पाटील, अभिजित पाटील, डॉ. मोहन पाटील, तानाजी मोरे, विकास मोहिते, जयवंत सावंत, ॲड. विलासराव हिरुगडे-पवार सतीश साखळकर, प्रशांत भोसले, आनंद देसाई उपस्थित होते.
मराठा समाज सांगली आणि कोरोना रुग्ण साहाय्य व समन्वय समितीच्या सहकार्याने गृह विलगीकरणातील कोरोना रुगणांसाठी ५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन मराठा समाज भवनात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचबरोबर १० जम्बो सिलिंडरही उपलब्ध करण्यात आले आहेत. गरजवंत लोकांना अडचणीच्या काळात श्वास देऊन जीवनदान देण्यासाठी ही यंत्रे काम करतील, असा विश्वास निकम यांनी यावेळी व्यक्त केला.
चौकट
वेटिंग बेडसची सुविधा
मराठा समाज सांगली, नमरा फाऊंडेशन, डाॅ. सुहास वाघ फाऊंडेशन व रुग्ण साहाय्यता समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सांगलीच्या शासकीय रुग्णालयासमोर एका मंडपाखाली पाच वेटिंग ठेवण्यात येणार आहेत. त्याची परवानगी मागितली असून त्याचा निश्चित फायदा तातडीच्या ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना होईल, असे साखळकर यांनी सांगितले.