लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : देशात ठिकठिकाणी सुरू केलेल्या सुमो सिलिंडरचा पुरवठा आता सांगली जिल्ह्यातही सुरू झाला आहे. हजारवाडी (ता. पलूस) येथील गॅस संयंत्रामधून त्याची निर्मिती सुरू केली आहे. या संयंत्रातून सांगलीसह सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांनाही पुरवठा केला जाणार आहे.
हिंदुस्तान पेट्रोलियमच्या हजारवाडी गॅस संयंत्रामधून घरगुती गॅसबरोबरच औद्योगिक वापरासाठी ४२५ किलोग्रॅमचा सुमो गॅस सिलिंडर तयार केला जात आहे. सांगली जिल्ह्यातील हजारवाडी येथील प्रकल्पातून दररोज घरगुती, व्यावसायिक तसेच ओद्योगिक वापरासाठी सिलिंडर भरून सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्याला पुरवठा केला जातो.
यापूर्वी केवळ ५ किलो, १४.२, १९, ३५ व ४७ किलो वजनाचे सिलिंडर पुरविण्यात येत होते. आता या सिलिंडरसह ४२५ किलोचा सिलिंडर भरून पुरवठा करण्यासाठी सज्ज आहे. उद्योग क्षेत्रातील कारखान्यांनी याचा फायदा घ्यावा, असे आवाहन वरिष्ठ संयंत्र प्रबंधक किरण जीवन यांनी केले आहे.
सिलिंडर पुरवठ्याच्या प्रारंभावेळी वरिष्ठ उपप्रबंधक आभास कुलश्रेष्ठ, सुरक्षा अधिकारी ऋषिकेश पाटील, कोल्हापूर जिल्हा वितरण अधिकारी आदित्य टांक, आकांक्षा नालावडे, रोहितकुमार, सौमित्र जैसवाल, सुरक्षारक्षक जावलेकर, मुन्नाभाई पटेकरी, आदी उपस्थित होते.
चाैकट
काय होणार फायदा
लग्नकार्यासह अन्य मोठ्या कार्यक्रमात हजारो लोकांचे जेवण बनविण्यासाठी अनेक सिलिंडर लागत होते. आता एका सिलिंडरमध्ये हजारो लोकांचे जेवण सहज होऊ शकते. व्यावसायिक स्तरावर अनेक छोट्या, मोठ्या व्यावसायिक व उद्योजकांनाही याचा फायदा होऊ शकतो.