शरद जाधव ।सांगली : ‘चूल आणि मूल’ ही चौकट ओलांडून महिलांनी आता प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवला आहे. असे असले तरी समाजात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही अधोरेखित होत असतात. या पार्श्वभूमीवर अत्याचारग्रस्त महिलांना एकाच छताखाली वैद्यकीय, कायदेशीर, समुपदेशक व गरज असल्यास आश्रयाची सुविधा उपलब्ध असावी, या हेतूने केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाकडून ‘सखी वन स्टॉप सेंटर’ सुरू करण्यात आले आहे. सांगलीतील केंद्रातून वर्षभरात ८२ महिलांना मदत करत ११ महिलांना न्याय मिळाला आहे.
महिला व बालकल्याण विभागातर्फे या केंद्राचे कामकाज चालते. सांगलीतील केंद्राकडे कौटुंबिक हिंसाचाराच्या ६३ तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यातील १२ तक्रारींमध्ये समुपदेशनाव्दारे यशस्वी समझोता करण्यात आला, तर ३ प्रकरणे न्यायालयात दाखल करण्यात आली. त्यातील एक प्रकरणावर न्यायालयात समझोता झाला.
लैंगिक अत्याचाराची एक तक्रार होती, तर सायबर क्राईमच्या दोन तक्रारींचे योग्य निपटारा करण्यात आला. यानुसार ८२ महिलांचे समुपदेशन करण्यात आले, तर ७ महिलांना वैद्यकीय मदत, १९ अत्याचारग्रस्त महिलांना न्यायालयीन व कायदेशीर मदत, ५ महिलांना पोलीस मदत, तर ६ महिलांची निवासाची व्यवस्था करण्यात आली.
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असल्या तरी, त्यांच्यावरील अत्याचाराच्या घटनाही वाढत असल्याची बाब गंभीर आहे.
महिलांना शारीरिक, मानसिक, लैंगिक छळ व सायबर क्राईममधील पीडित महिलांना पोलीस, वकील, समुपदेशक अशा अनेकांची मदत घ्यावी लागते. मात्र, अत्याचारानंतर या विविध विभागांकडे जाऊन कोणत्याही प्रकारची मदत घेण्याची मानसिकता त्या महिलेची उरलेली नसते. याचसाठी अन्याय झालेल्या महिलेला आधार देण्यासाठी ‘सखी वन स्टॉप’ काम करत आहे. अत्याचार झालेल्या महिलेची तात्पुतत्या स्वरूपात निवासाचीही व्यवस्था करण्यात येत आहे. या सेंटरमधून मोफत वैद्यकीय सुविधा, पोलीस मदत, समुपदेशन, कायदेशीर मदत आदी सुविधा मिळत आहेत.
- चोवीस तास सेवेमुळे लाभ
सखी वनस्टॉपमध्ये २४ तास मदत मिळते, हे विशेष! एका महिलेला तिच्या पतीने रात्री साडेआठ वाजता घरातून हाकलून दिले होते व तिचे आठ, नऊ महिन्यांचे बाळही काढून घेतले होते. यावेळी महिलेने ‘सखी वन स्टॉप’ची मदत घेताच, केवळ तासाभरात इचलकरंजीहून तिला तिचे बाळ मिळाले होते, तर एका घटनेत विटा येथे रात्री अकरा वाजता एका महिलेस मारहाण करून पतीने घराबाहेर काढले होते. या महिलेसही केंद्राचा तातडीने मदतीचा हात मिळाला होता.
महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांपैकी ‘सखी वनस्टॉप’चा उपक्रम अत्याचारग्रस्त महिलांना खूपच मदतीचा ठरत आहे. चोवीस तास सुविधेचाही उपयोग होत आहे. त्यामुळे अत्याचार झालेल्या महिलांनी केंद्राशी संपर्क साधून सुविधेचा लाभ घ्यावा.- सुवर्णा पवार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी.