अशोक डोंबाळे
सांगली : जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस केवळ ४६ टक्केच झाला आहे. दुष्काळी तालुक्यांना तर पूर्णत: पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. या दुष्काळाच्या तीव्र झळांमध्ये टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनांचा शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे. सप्टेंबर २०२३ पर्यंत चालविलेल्या योजनांचे वीजबील ५४ कोटी ७१ लाख रुपये आले आहे.जिल्ह्यात १ जून ते २१ सप्टेंबरपर्यंत ४९१.५ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते. पण, केवळ २०७.१ मिलीमीटर पाऊस झाला असून जिल्ह्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव तालुक्यांसह मिरज पूर्व भागात ४२.१ टक्केच पाऊस झाल्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. खरीप हंगाम वाया गेला असून रब्बीची पेरणी होणेही कठीण आहे.या दुष्काळाच्या तीव्र टंचाईत टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनेतून पाणी सोडून ७०० पाझर तलाव, बंधारे भरून घेतले आहेत. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, मिरज पूर्व, कडेगाव, खानापूर तालुक्यातील काही गावे आणि वाड्या-वस्त्यांवरील पाणीटंचाई काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे. सिंचन योजनांमधून पाणी सोडले नसते तर दुष्काळाची तीव्रता आणखी भीषण झाली असती, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत.
असे उचलले पाणी
म्हैसाळ योजना १८ जुलैपासून चालविली असून तीन टीएमसी ८७६.६५ दशलक्ष घनफूट पाणी उचलले आहे. यासाठी महावितरणचे २८ कोटी सात लाख रुपयांचे वीजबील आले आहे. टेंभू योजना २१ जुलैपासून चालू असून चार टीएमसी ३५ दशलक्ष घनफूट पाणी उचलले असून १८ कोटी ३१ लाख रुपयांचे वीजबील आले आहे. ताकारी योजना २२ जुलैला चालू झाली असून एक टीएमसी ३७२.५७ दशलक्ष घनफूट पाणी उचलले असून सात कोटी ३३ लाख रुपये वीजबील आहे. ताकारी योजना ३१ ऑगस्टला बंद केली आहे.
सातशे तलाव, बंधारे भरलेम्हैसाळ योजनेतून मिरज, कवठेमहांकाळ, जत, तासगाव तालुक्यातील ४३२, टेंभू योजनेतून कडेगाव, खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ, सांगोला तालुक्यातील १६५ आणि ताकारी योजनेतून कडेगाव, तासगावसह सहा तालुक्यातील १३४ तलाव, बंधारे भरून घेतले आहे. यामुळे पिण्याचे पाणी व पशुधनाच्या चारा टंचाईचा प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे.