लोकमत न्यूज नेटवर्क
कसबे डिग्रज : सांगलीत वसंतदादा साखर कारखान्याच्या वतीने अध्यक्ष विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या वसंतदादा कोविड सेंटरमधून कसबे डिग्रज येथील नेपाळी गुरखा धमतुलासिंह बहरा हा पहिला रुग्ण कोरोनामुक्त झाला. त्यास फुलांचा वर्षाव करून निरोप देण्यात आला.
कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील गुरखा धमतुलासिंह बहरा सुरक्षा सेवा देत आहे. त्याची भाषा वेगळी, पद्धती वेगळ्या, तर गाव हजारो किलोमीटर दूर; पण त्याने गावकऱ्यांशी चांगले नाते निर्माण केले आहे. काही दिवसांपूर्वी त्यालाही कोरोनाचा संसर्ग झाला. भाषेच्या अडचणीमुळे तो कोणाला काही सांगू शकत नव्हता; पण तो आजारी असल्याचे लक्षात आले. जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले यांनी पुढाकार घेत त्याच्या सर्व चाचण्या, तपासणी आरोग्य केंद्रात केल्या. त्यास कोरोना झाल्याचे सिद्ध झाले. त्याची ऑक्सिजन पातळी कमी झाली होती. त्यास चौगुले यांनी तात्काळ वसंतदादा कोविड सेंटरमध्ये दाखल केले. त्याचे कोणी नातेवाईक नसल्याने स्वतः पालकत्व स्वीकारले. डॉ. कौस्तुभ शिंदे व डॉ. स्वाती शिंदे यांनी आठ-दहा दिवस उपचार केले. त्याच्या खाण्यापिण्याची सोय केली. सर्व सेवा मोफत दिल्या.
तो नुकताच कोरोनामुक्त झाला. त्यास कोविड सेंटरच्या वतीने पहिला कोरोनामुक्त म्हणून फुलांच्या वर्षाव करून निरोप देण्यात आला.