दिलीप मोहितेविटा : खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर येथे बंदिस्त पाइपलाइनद्वारे येणारे टेंभूचे पाणी बंद केल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी सायंकाळी टेंभूच्या अधिकाऱ्यांना कोंडून घातले. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार सुहास बाबर यांना लक्ष्य करीत त्यांनीच पाणी बंद करण्यास सांगितल्याचा आरोप केला.त्यामुळे आमदार बाबर समर्थक कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. परिणामी, टेंभूच्या पाण्यावरून शिंदेसेना व भाजप या दोन्ही सत्ताधारी पक्षांत जुंपली असून, आमदार बाबर व आमदार गोपीचंद पडळकर समर्थक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या पाण्यावरून आता श्रेयवादाचा मुद्दा उफाळला आहे. ढवळेश्वर येथे नेवरी वितरिकेतून टेंभूचे पाणी सोडण्यात आले. परंतु, हे पाणी अवघ्या तासाभरातच बंद झाल्याने शेतकरी संतप्त झाले. त्यांनी थेट विट्यातील टेंभूचे कार्यालय गाठून अधिकाऱ्यांना पाणी का बंद केले? असा जाब विचारला.
परंतु, अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. यावेळी आमदार बाबर यांनीच अधिकाऱ्यांना सांगून पाणी बंद करण्यास भाग पाडल्याचा आरोप आमदार पडळकर समर्थकांनी करत आमदार बाबर यांचा निषेध केला. त्यामुळे आमदार बाबर समर्थक कार्यकर्तेही चांगलेच आक्रमक झाले. गुरुवारी नेवरी वितरिकेजवळच्या बंधाऱ्यावर आमदार बाबर समर्थक शंभरहून अधिक शेतकरी एकत्रित आले. त्यांनी या घटनेचा निषेध करीत आमदार बाबर यांची बदनामी खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला.
पाणी देऊन न्याय देण्याची शेतकऱ्यांची मागणीया प्रकारामुळे राज्यात एकत्रित सत्तेत असलेल्या भाजप व शिंदेसेनेतील संघर्ष वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, सध्या उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा परिस्थितीत शेतीपिके करपून जाऊ लागली असून, शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी टेंभूच्या पाण्यात कोणताही श्रेयवाद न आणता शेतकऱ्यांना टेंभूचे पाणी देऊन न्याय द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.