बागणी : भाजपचे सरकार सरकारी मराठी शाळांच्या मुळावर उठले आहे. निधीअभावी या शाळा चालवणे जमत नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे. जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिरातींवरील कोट्यवधीचा खर्च कमी केला, तर राज्यातील गरीब कुटुंबातील मुले शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
ढवळी (ता. वाळवा) येथे रयत शिक्षण संस्थेच्या राष्टÑीय जलतरणपटू सागर पाटील माध्यमिक विद्यालयातील प्रा. डॉ. एन. डी. पाटील ग्रंथालय व अभ्यासिकेच्या उद्घाटनप्रसंगी खा. सुप्रिया सुळे बोलत होत्या.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, शरद पवार यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात महिलाभिमुख राज्यकारभार केला. महिलांना आरक्षण देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले. त्याही पुढे जाऊन पवार यांनी महिलांना वडिलोपार्जित मालमत्तेचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला. मात्र, सध्याच्या सरकारने, घटनेने दिलेला ६ ते १४ वयोगटातील मोफत शिक्षणाचा अधिकार हिरावून घेण्याचा घाट घातला आहे.
राज्यातील शिक्षण व्यवस्था फार मोठ्या अडचणीतून चालली आहे. राज्यातील ११३ शाळा बंद करण्याचा सरकारने घेतलेला निर्णय गोरगरीब कुटुंबातील मुलांच्यादृष्टीने घातक आहे. आत्ताच्या शासनकर्त्यांनी, करोडो रुपयांच्या जाहिराती करण्यापेक्षा, तोच खर्च जर शिक्षणावर केला, तर गोरगरिबांची मुलं शिकू शकतील, याचा त्यांनी विचार केला पाहिजे. सध्या सरकार शिक्षण विभागात दररोज एक वेगळा, शासन आदेश काढून शिक्षणाची भूमिका बदलत आहे. या गोंधळात विद्यार्थी आणि शिक्षक आहेत. राज्य सरकारच्या या धोरणाविरोधात राष्ट्रवादी तीव्र आंदोलन छेडणार असून, गरिबांच्या शिक्षणाबरोबर खेळ खंडोबा करू देणार नाही. एकसुद्धा शाळा बंद पाडू देणार नाही, असा विश्वासही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
रयत शिक्षण संस्थेच्या सदस्या सरोज पाटील यांनी प्रास्ताविक के ले. त्या म्हणाल्या, ‘लोकमत’ वृत्तसमूहाने आदर्श व सुंदर शाळा म्हणून सागर पाटील विद्यालयाचा गौरव केला आहे. हीच वाटचाल आम्ही पुढे चालू ठेवली आहे.प्रा. एन. डी. पाटील यांनी आपल्या शाळेविषयी असणाºया जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच त्यांनी गावकºयांना व उपस्थितांना; जर मला ढवळी परिसरात जमीन उपलब्ध झाली, तर मी येथील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय सुरु करीन, असे आवाहन केले.
रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी रयत शिक्षण संस्थेच्या इंटरनॅशनल स्कूलसाठी ढवळीची निवड करण्यात आल्याचे जाहीर केले. संस्थेच्यावतीने त्यांना शाळेस २५ टॅब भेट दिले. फ्युचर अॅग्रिकल्चर शाळा व शाळेमध्ये शुध्द पिण्याच्या पाण्याची सुविधा देण्याचे व आयआयटी फौंडेशन कोर्स देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
यावेळी माजी खासदार रामशेठजी ठाकूर, प्रशांत पाटील, संगीता पाटील, श्री शाहू शिक्षण प्रसारक व सेवा मंडळाच्या सचिव विद्याताई पोळ, रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. भाऊसाहेब कराळे, युनोचे सदस्य आणि भारतीय हवामान तज्ज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी, ढवळी गावच्या सरपंच पद्मावती माळी यांच्यासह ग्रामस्थ, पालक शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.जाहिरातीवरील खर्च : शिक्षणावर करारयत शिक्षण संस्थेचा कार्यक्रम म्हणजे राजकीय व्यासपीठ नाही. पंतप्रधान मोदी यांचे सरकार डिजिटल इंडिया, मेट्रो, मेक इन इंडिया यासारखे मोठे प्रकल्प राबवत आहे. जाहिरातीवर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहेत. विकासासाठी या गोष्टी आवश्यकच आहेत; मात्र राज्यातील त्यांच्याच पक्षाच्या सरकारने मराठी शाळा बंद करण्याचा जो घाट घातला आहे, त्याविरोधात राष्ट्रवादी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. गरिबांच्या मुलांचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेण्याचा त्यांचा कुटिल डाव आम्ही उधळून लावू, असा इशाराही सुप्रिया सुळे यांनी दिला.ढवळी (ता. वाळवा) येथील राष्टÑीय जलतरणपटू सागर पाटील माध्यमिक विद्यालयात ‘सागरझेप’ पुस्तकाचे प्रकाशन खासदार सुप्रिया सुळे यांच्याहस्ते मंगळवारी झाले. यावेळी डावीकडून सरोज पाटील, श्री शाहू शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव विद्याताई पोळ, एन. डी. माने, प्रा. एन. डी. पाटील, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, रयत शिक्षण संस्था सचिव डॉ. भाऊसाहेब कराळे आदी उपस्थित होते.