कडेगाव : टेंभू योजनेच्या सुर्ली कालव्यात नेर्ली हद्दीत तुंबा (बांध) घालून अडवलेले पाणी ओढ्याद्वारे कडेगाव तलावात सोडलेले पाणी अज्ञातांनी नेर्ली हद्दीत फोडले. यामुळे कडेगाव तलावात जाणारे पाणी बंद झाले. टेंभू योजनेच्या सुर्ली कालव्याद्वारे सुर्ली, खंबाळे, नेर्ली, अपशिंगे, कोतवडे या गावांना पाणी दिले जाते. कडेगाव येथील पाणी टंचाईवर उपाययोजना म्हणून या सुर्ली कालव्यात नेर्ली हद्दीत मुरूम आणि माती घालून पाणी अडवले आहे. अडवलेले पाणी नेर्ली ओढ्यात सोडले आहे. नेर्ली ओढ्यातून योजनेचे पाणी कडेगाव तलावात सोडले आहे. गुढीपाडव्यापासून कडेगाव तलावात पाणी सुरू आहे. दरम्यान, नेर्ली, अपशिंगे, कोतवडे या तीनही गावांना याच कालव्यातून पाणी पुढे जाते. या गावांमध्येही भीषण पाणी टंचाई आहे. परंतु प्रशासनाच्या आदेशानुसार फक्त कडेगाव तलावात पाणी सोडले आहे. कडेगाव तलावात पाणी सोडण्यासाठीही केवळ एकच पंप सुरू केला आहे. नेर्ली ओढ्यातूनही विद्युत मोटारीद्वारे पाणी उपसा करीत आहेत. यामुळे कडेगाव तलावाची पाणीपातळी वाढलेली नाही. दरम्यान, नेर्ली, अपशिंगे, कोतवडे येथील ग्रामस्थही पाणी टंचाईने हैराण झाले आहेत. यामुळे येथील काही अज्ञातांनी मंगळवारी रात्री सुर्ली कालव्यामध्ये मुरूम, माती टाकून टेंभू योजनेच्या प्रशासनाने अडवलेले पाणी फोडून पुढे नेले. पाणी अडवण्यासाठी घातलेला मुरूम-मातीचा कालव्याच्या आतील तुंबा फोडला आहे. कालवा फोडला अशी सर्वत्र चर्चा झाली, परंतु कालवा फोडलेला नाही, येथील तुंबा फोडला आहे. दरम्यान, टेंभूच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी पाणी पुन्हा अडवून तलावाकडे सोडण्याचे काम सुरू केले. कालव्यात अडवलेले पाणी फोडून पुढे पळवणाऱ्या अज्ञातांविरुध्द कडेगाव पोलिसात शाखा अभियंता दीपक निर्मळे यांनी तक्रार दिली. (वार्ताहर)तीनपैकी एकच पंप सुरूटेंभू योजनेच्या सुर्ली कालव्याद्वारे पाणी सोडण्यासाठी तीन पंप आहेत. परंतु यापैकी दोन नादुरूस्त आहेत. केवळ एका पंपाद्वारे कडेगाव तलावात पाणी सोडून तलावाची पाणी पातळी वाढणार नाही. कारण मागे ओढ्यावरही पाणी उपसा सुरू असतो. उर्वरित दोन्ही पंप दुरूस्त करुन पूर्ण क्षमतेने पाणी सोडल्यास कडेगाव तलावासह नेर्ली, अपशिंगे, कोतवडे, तडसर आदी गावांनाही सुर्ली कालव्याद्वारे पाणी देता येईल.
टेंभूच्या सुर्ली कालव्यात अडविलेले पाणी पळविले
By admin | Published: April 20, 2016 11:58 PM