सांगली : पतंगराव कदम यांनी लहान भावाप्रमाणे माझ्यावर प्रेम केले. मिरज विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीवेळी ते विरोधी उमेदवार कोण पाहिजे, असे म्हणत मला विचारूनच काँग्रेसचा उमेदवार द्यायचे, असा गौप्यस्फोट भाजपचे नेते व कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी रविवारी सांगलीतील कार्यक्रमात केला.शहरातील सिव्हिल चौकास डाॅ. पतंगराव कदम चौक असे नाव देण्यात आले. या नामकरण सोहळ्याच्या कार्यक्रमात भाजप व काँग्रेसच्या नेत्यांनी हजेरी लावली होती.
दोन्ही पक्षाच्या नेत्यांत राजकीय जुगलबंदीही रंगली. खाडे म्हणाले की, पतंगराव कदम जेव्हा मला उमेदवार कोण द्यायचा, असे विचारत होते, तेव्हा मी त्यांना सांगत असे की, कोणीही द्या. मिरज मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर सांगलीच्या काँग्रेस भवनात एकदा बैठक झाली. त्या बैठकीत पतंगरावांनी सर्व तालुक्यात लक्ष घालणार, अशी घोषणा केली, पण मिरजेत आपण जिंकू शकत नाही, असे जाहीरपणे सांगत. पतंगराव व मदनभाऊंशी माझी मैत्री होती. वेगवेगळ्या पक्षात असलो तरी कधीही एकमेकांच्या आडवे गेलो नाही.
पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या साक्षीने खासदार संजयकाका पाटील यांनी काँग्रेसच्या नेत्यांनाच भाजप प्रवेशाची खुली ऑफर दिली. पाटील म्हणाले की, देश कुठल्या दिशेने जात आहे, याचा विचार काँग्रेस नेत्यांनी करावा. विश्वजित कदम यांच्यासह सर्वांनी भाजपमध्ये यावे. विक्रम सावंत यांनाही ऑफर आहे. विशाल पाटील व पृथ्वीराज पाटील यांना त्याची खरी गरज आहे. भाजपमध्ये अनेक संधी निर्माण होत आहे. त्याचा लाभ या दोघांना होईल. या ऑफरमुळे माझे हितशत्रू जागे होतील. पण त्यांना घाबरणारा संजयकाका कसला? संघर्ष करणे हेच माझे काम आहे.