श्रीनिवास नागे
'मी पंचविशीचा होईपर्यंत विरोधक संपलेले असतील', असं ठणकावून सांगणारे राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांना अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. रोहित यांचे चुलते सुरेश पाटील यांची भाजपच्या खासदारांशी असलेली 'सेटलमेंट', राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा तयार झालेला 'पॉवरफुल' गट रोहित यांच्या आमदारकीच्या मार्गातला अडसर ठरणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील दोन वर्षांत पंचविशीचे होतील; त्यांच्या २०२४ मधील विधानसभेच्या उमेदवारीची चर्चा दोन वर्षांपासूनच सुरू झालीय. त्यांच्यावर आर. आर. आबांचीच छाप. बोलण्याची ढब, लकब हुबेहूब तशीच. आबांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुमनताईंना पोटनिवडणुकीत आणि २०१९ मधल्या निवडणुकीत आमदारकीची संधी मिळाली. सहानुभूतीची लाट आणि आबांची पुण्याई कामाला आली.आता रोहित यांचं नाव पुढं येतंय; पण या निवडणुकीवेळी त्यांना वडिलांच्या पुण्याईपेक्षा कर्तबगारीच सिद्ध करावी लागेल. कर्तृत्व दाखवावं लागेल. लोकांत मिसळून कामं करावी लागतील. सगळे विरोधात असताना कवठेमहांकाळ नगरपंचायत ताब्यात घेऊन त्यांनी झलक दाखवलीच आहे.
दुसरीकडं मात्र पुतण्याच्या आमदारकीत चुलत्याचा अडसर ठरेल, असं बोललं जातंय. आबा असताना त्यांचे लहान बंधू सुरेश पाटील यांचा राजकीय क्षेत्राशी दुरान्वयेही संबंध नव्हता, किंबहुना आबांनीच तशी काळजी घेतली होती; पण आबांच्या निधनानंतर रोहित यांचं वय कमी असल्यानं सुमनताईंचं नाव पुढं आलं. त्यांना राजकारणाचा गंधही नव्हता. राजकीय अपरिहार्यतेमुळं गृहिणी असलेल्या सुमनताई आमदार झाल्या. कारभार मात्र सुरेश पाटील यांनी हातात घेतला. तेव्हापासून तासगाव- कवठेमहांकाळ मतदारसंघात त्यांचं 'सेटलमेंट'चं, सोयीचं राजकारण सुरू झालं.
मुळातच राजकीय आकलन, वकूब कमी. नेमकं हेच हेरून खासदार संजयकाका पाटील यांनी त्यांच्याशी हातमिळवणी केली. सोसायटीपासून लोकसभेपर्यंत प्रत्येक निवडणुकीत आबांचा गट काकांच्या दावणीला बांधला गेला. लोकसभेला आघाडीतून 'स्वाभिमानी'च्या तिकिटावर लढणाऱ्या विशाल पाटलांचा हात आबांच्या गटानं सोडल्याची चर्चाही झाली. सुरेश पाटलांचा हस्तक्षेप वाढत राहिला. त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळं निष्ठावंत नाराज झाले; पण आबाकाका गटांशिवाय तिसरा पर्याय दिसत नसल्यानं तोंड दाबून बुक्क्यांचा मार' सहन करीत राहिले. गावागावातच दोन-दोन गट तयार झाले.
ही घ्या 'सेटलमेंट...
खासदार संजयकाका पाटील यांच्या खासगी कंपनीनं तासगाव साखर कारखाना विकत घेतला. सभासदांना वायावर सोडलं. आता काकांच्या कारखान्यांनी उसाची बिलं थकवलीत. सुरेश पाटील दोन्ही साखर वर्षभरापासून शेतकरी टाचा घासताहेत. मोर्चे-आंदोलनं रोजचीच; पण सुरेश पाटील किंवा रोहित पाटील यांनी आंदोलन करणं सोडाच, याबाबत चकार शब्दही काढलेला नाही. त्याची भरपाई संजयकाकांनी बाजार समितीत केलीय, राष्ट्रवादीच्या ताब्यातल्या तासगाव बाजार समितीतला पाच कोटींचा गैरव्यवहार सिद्ध झालाय, त्यावर काकांची अळीमिळी गुपचिळी. शिवाय तो चव्हाट्यावर आणणायाला त्यांनीच गप्प केलंय.
'सिनियारिटी'साठी...
राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेचं निमित्त साधून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुलगा रोहित पाटील प्रतीकला संपूर्ण जिल्हाभर फिरवलंय. अगदी अंजनीतही. राष्ट्रवादीचं कोणतंही पद नसताना केवळ युवा नेते' असं बिरुद मिळालेले प्रतीक पाटील या संपूर्ण यात्रेत स्टेजवर पहिल्या रांगेत होते. जिल्हाभर डिजिटल फलकांवर झळकले. त्यांना रोहित पाटील यांच्यासोबत विधानसभेला किंवा त्याआधी लोकसभेला 'लाँच' करून राजकीय 'सिनियारिटी' टिकविण्यासाठी सगळी धडपड सुरू आहे.