कासेगाव: केदारवाडी (ता. वाळवा) येथील महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार करणाऱ्या वाठार (ता. कऱ्हाड) येथील सरपंच विलास सुभाष पाटील याच्याविरोधात कासेगाव पोलिसांत शनिवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला. आपल्यावर गुन्हा दाखल होणार याची कुणकुण लागल्याने पाटील याने इस्लामपूर येथील न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविला आहे. संशयित विलास सुभाष पाटील हा वाठार (ता. कऱ्हाड) येथे सरपंच म्हणून कार्यरत आहे. पाटील याने केदारवाडी येथील महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर कऱ्हाड, कासेगाव परिसरात वारंवार बलात्कार केला. या महिलेचा पती व विलास पाटील हे चांगले मित्र होते. त्यातूनच या महिलेचा आणि पाटील याचा संबंध आला होता. त्यामुळे विलास पाटील याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. लग्न करण्यास पाटील याने नकार दिल्याने या महिलेने कासेगाव पोलिसांत २१ आॅगस्ट रोजी तक्रार अर्ज केला होता. हे प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर शनिवारी उशिरा विलास पाटील याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. दरम्यान, गुन्हा दाखल होणार असल्याची कुणकुण लागल्याने विलास पाटील याने यापूर्वीच अटकपूर्व जामीन मिळविला होता, असे कासेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदकुमार माने यांनी सांगितले. (वार्ताहर)
बलात्कारप्रकरणी सरपंचाला जामीन
By admin | Published: August 29, 2016 12:20 AM