रेठरे धरण : सुरूल (ता. वाळवा) गावच्या पूर्वेस सदाशिव रघुनाथ पाटील यांच्या उसाच्या शेतात बिबट्याचे तीन बछडे सापडले आहेत. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
सुरूलमध्ये मागील आठवड्यातही बिबट्याचा एक बछडा ऊस तोडताना सापडला होता. सोमवारी सकाळी साडेनऊच्यासुमारास गावच्या पूर्वेला ओढ्यावरील पुलाजवळील सदाशिव पाटील यांच्या शेतात ऊसतोड सुरू होती. त्यावेळी उसाच्या पाचटाखाली काळपट रंगाचे बिबट्याचे लहान मांजरासारखे तीन बछडे ग्रामस्थांना आढळून आले. यावेळी ग्रामसेवक राजेंद्र देवकर, माजी सरपंच संदेश पाटील व पोलीसपाटील माणिक पाटील यांनी खात्री करून वन विभागाला माहिती दिली. तीन बछडे आढळून आल्यावर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन त्यांचे निरीक्षण करून बिबट्याची मादी कुठे आढळते का, याचा शोध घेतला. शेतकऱ्यांना सावध रहाण्याचा सल्ला दिला आहे, दरम्यान, बछड्यांना पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. हे बछडे त्यांच्या मातेने घेऊन जावेत, यासाठी वनक्षेत्रपाल व अन्य कर्मचाऱ्यांनी ते शेतात सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले.
अन्न साखळी तुटल्याने डोंगर परिसरातील बिबट्याचे आता उसाच्या शेतातील वास्तव्य व बछड्यांना जन्म देण्याच्या घटनेने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण आहे. वनक्षेत्रपाल सुशांत काळे, शिराळा, वनपाल अमोल शिंदे, वनरक्षक अधिकारी दीपाली सागावकर, वनरक्षक रायना पाटोळे, अमोल साठे, शहाजी खंडागळे यांच्यासह वनखात्याचे कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.